हवामानावर संशोधन काळाची गरज : नाईक
By admin | Published: December 5, 2015 11:28 PM2015-12-05T23:28:48+5:302015-12-05T23:30:37+5:30
विज्ञान परिषदेकडे अधिकाऱ्यांची पाठ
कुडाळ : भविष्यात जीवनात हवा आणि हवामानावर संशोधन करणे काळाची गरज आहे. गेल्या काही महिन्यात सिंधुदुर्गासह राज्यात पाऊस फारच कमी प्रमाणात झाला असून या परिस्थितीचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी यांनी २३ व्या राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे उद्घाटन प्रसंगी केले. भारत सरकारच्यावतीने असलेल्या या राज्यस्तरीय विज्ञान परिषदेकडे प्रशासनाने व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली. यामुळे उपस्थितांमध्ये प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नाराजी व्यक्त होत होती.
नेरूरपार येथील वसुंधरा विज्ञान केंद्र येथे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यातर्फे आयोजित केलेल्या २३ व्या राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी जिज्ञासा संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र्र दिगे, बी. बी. जाधव, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम. जी. मातोंडकर, वसुंधरा संस्थेचे विश्वस्त अविनाश हावळ, वसुंधरा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बर्डे, वसुंधरा संस्थेचे समन्वयक के. एम. पटाडे, लुपिन फाउंडेशनचे नारायण परब, राजू शेट्ये, परशुराम परब व मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी केलेल्या प्रास्ताविकात पटाडे यांनी वसुंधराने विज्ञानाचा सुरु केलेल्या कार्याचा धावता आढावा सांगितला. वसुंधराने विज्ञान क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडविले आहेत असेही ते म्हणाले.
गेली चार वर्षे हे काम करण्यात येते. आजपर्यंत वसुंधरामधून वेद दळवी व मिहीर पाटील हे दोन विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर निवडले गेले होते, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. व्ही. प्रभूखानोलकर यांनी केले.
जिल्ह्याला पहिल्यांदाच ही परिषद घेण्याचा प्रथमच मान मिळाला असतानाही या राज्यस्तरीय परिषदेकडे आमदार वैभव नाईक, सभापती गुरुनाथ पेडणेकर या लोकप्रतिनिधींनी आवर्जून उपस्थिती लावली. मात्र, प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हता. (प्रतिनिधी)
६६ प्रकल्प : ३0 जणांची निवड
या परिषदेच्या निमित्ताने राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील २१२ बालवैज्ञानिक ६६ प्रकल्पांसह येथे आले असून या ठिकाणी विज्ञानाबाबत विचारांची देवाणघेवाण या बालवैज्ञानिकांमध्ये होणार आहे. राज्यस्तरावरील या ६६ प्रकल्पांमधून राष्ट्रीय स्तरासाठी ३० प्रकल्पांची निवड होणार आहे असे दिघे म्हणाले.