वनौषधींचे जतन करण्याची गरज
By admin | Published: June 28, 2015 11:24 PM2015-06-28T23:24:34+5:302015-06-28T23:24:34+5:30
खोटलेत कार्यशाळा : कित्येक वनौषधींच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका
कडावल : कोकणातील रानावनात विविध वनौषधींचा खजिना ठासून भरला आहे. मात्र, अज्ञानामुळे कित्येक वनौषधींच्या प्रजाती कायमच्या नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वनौषधी व आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे संवर्धन होऊन मानवाला रोगमुक्त करण्यासाठी समाजधुरिणांसह प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचीही गरज आहे. कुडाळ तालुक्यातील खोटले येथे झालेल्या कार्यशाळेत वनौषधींबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.आजची पिढी विविध शारीरिक आणि मानसिक व्याधींनी ग्रासली आहे. तिशीच्या आतील वयाच्या तरुणांमध्ये आज मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यासारख्या घातक आजारांची लक्षणे दिसत आहेत. शहरी किंवा ग्रामीण भागातील जवळपास प्रत्येक घरापर्यंत या व्याधी पोहोचल्या आहेत. धकाधकीचे जीवन, रासायनिक खते व औषधांचा अंश असलेले अन्नधान्य, ताणतणाव तसेच इतरही अनेक कारणे यामागे आहेत. असंख्य रोगांचा सामना करण्यासाठी आज लोक अॅलोपॅथिक औषधांचा सर्रास वापर करीत आहेत. मात्र, या औषधांच्या दुष्परिणामांमुळे विकतचे दुखणे घेतल्याची परिस्थिती अनेकांवर ओढवत असल्याचे चित्र दिसते. या भयाण वास्तवापासून भारतीय चिकित्सा व उपचार पद्धतीचा मानबिंंदू असलेला आयुर्वेद रुग्णांची सहीसलामत सुटका करू शकतो आणि औषधी गुणधर्म असलेली विविध वृक्षसंपदा कोकणच्या रानावनात सुदैवाने अगदी ठासून भरली आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अशा विविध वनस्पती आहेत, की ज्यांपासून अनेक व्याधींवर उच्च प्रतीची आयुर्वेदिक औषधे निर्माण होऊ शकतात. आवळा, एरंड, कुडा, गुळवेल, दारू हळद, आंबे हळद, नागकेशर, बेहडा, हरडा, बेल, ऐन, सातिवन, गरूडवेल तसेच इतर शेकडो वनौषधींनी येथील जंगले समृद्ध आहेत.
काही दिवसांपूर्वी कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी येथील सद्गुरू भक्तसेवा न्यासच्यावतीने खोटले येथे वनौषधे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राबविण्यात आलेल्या वनौषधी शोध मोहिमेत तेथील जंगल परिसरात सुमारे दोनशेहून अधिक वनौषधी आढळून आल्या. यावरून कोकणातील इतर भागातील विस्तीर्ण जंगलांमध्ये किती प्रमाणात उपयुक्त वनस्पती असतील, याची सहज कल्पना येते. हा अमूल्य ठेवा जपण्यासाठी, त्याचे संवर्धन करण्यासाठी आयुर्वेदातील धुरिणांसह सुजाण नागरिकांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे.
भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाला महत्त्वाचे स्थान आहे. या उपचार पद्धतीमुळे कुठल्याही आजारावर शाश्वत उपचार करता येणे शक्य आहे. मात्र, आजच्या पिढीला वनौषधींचे ज्ञान नसल्याने ही सहजसोपी उपचार पद्धती मागे पडली आहे. या अज्ञानामुळेच कित्येक वनौषधींच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वनौषधी व आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे संवर्धन होऊन मानवाला रोगमुक्त
करण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचीही नितांत गरज आहे. (वार्ताहर)