सामाजिक समतेचे विचार रूजण्यासाठी तरुणांच्या योगदानाची गरज
By admin | Published: April 15, 2016 10:59 PM2016-04-15T22:59:53+5:302016-04-15T23:35:22+5:30
दीपक केसरकर : सिंधुदुर्गनगरी येथे सामाजिक समता सप्ताहाची सांगता
ओरोस : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली सामाजिक समता समाजात अधिक दृढ होण्यासाठी ग्रामीण भागापर्यंत रुजण्यासाठी युवक-युवतींच्या योगदानाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
सिंधुदुर्गनगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आयोजित सामाजिक समता सप्ताहाच्या सांगता समारंभात पालकमंत्री दीपक केसरकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, सहायक आयुक्त समाज कल्याण जयंत चाचरकर, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर उपस्थित होते.
कृषी क्षेत्रात होणारे बदल, पाण्याचे सुयोग्य नियोजन, समतोल आर्थिक विकास, सुधारित चाऱ्याची लागवड, कौशल्यवृद्धी, पर्यटनातून रोजगाराच्या संधी, आदींमधून रोजगाराच्या संधी व आर्थिक स्तर उंचावू शकतो. याचाच विचार करून युवक-युवतींनी यामध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत. याचा अभ्यास करून ग्रामीण व शहरी भागात याचा प्रसार केल्यास सामाजिक समता अधिक दृढ होण्यास मदत होईल, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, यासाठी येत्या सहा महिन्यांत जिल्ह्यात केंद्र्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आज देशभरात ‘ग्राम उदय से भारत उदय’ हे अभियान सुरू होत आहे. या अभियानाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आजपासून प्रारंभ झाल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
विशेष घटक योजनेअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने काढलेल्या ‘तिमिरातून तेजाकडे’ या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते झाले. जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमध्ये या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले असून, आजच्या विशेष ग्रामसभेत याचे वाचन करण्यात येणार आहे. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण प्राप्त चंद्र्रकांत जाधव यांच्या ‘समाजसेवेची ४० वर्षे’ या गौरवग्रंथाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन पैलू विषद केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी यांचेही यावेळी भाषण झाले. यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे, स्मृतिचिन्ह देण्यात आले. सहायक आयुक्त समाज कल्याण जयंत चाचरकर यांनी प्रास्ताविक, श्याम सावंत यांनी सूत्रसंचालन, तर तालुका समन्वयक सुरेखा डवर यांनी आभार मानले. (वार्ताहर)