कांजी, रूमडाची शीतपेये दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2016 12:19 AM2016-05-14T00:19:42+5:302016-05-14T00:19:42+5:30
रासायनिक शीतपेयांचा वापर वाढला : आरोग्याला पोषक तरीही लोकप्रियतेची उणीव
सुरेश बागवे ल्ल कडावल
बदलत्या जीवनशैलीत सर्वच बाबतीत पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्याच्या अट्टाहासापायी बेचव व आरोग्यास अपायकारक शीतपेये घशात ओतली जात आहेत. बाजारात अतिक्रमण केलेल्या या बेगडी पेयांच्या भाऊगर्दीत कांजी किंवा रूमडाच्या पाण्यासारखी शुद्ध, नैसर्गिक, मधूर व शीतल पेये मात्र नामशेष होत आहेत.
उन्हाळ््यातील रखरखते ऊन व जीवघेण्या उकाड्यामुळे अंगाची लाही-लाही होत असताना रूचकर व शीतल असे रूंबड किंवा रूमडाचे पाणी होरपळलेल्या शरीराबरोबरच मनालाही थंडावा देत असे. रूमडाचे पाणी औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याचे मानले जात असल्याने पूर्वी या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. विशेषत: असह्य उकाड्याला उतारा म्हणून कडक उन्हाळ््यात या पाण्याचा वापर नैसर्गिक शीतपेय म्हणून अधिक प्रमाणात व्हायचा. मात्र, कालचक्राच्या प्रवाहाबरोबर आधुनिकतेच्या नावाखाली बाजारात घुसखोरी केलेल्या शेकडो बेचव, बेगडी शीतपेयांच्या मांदियाळीत मधुर, रूचकर व शीतल असलेले रूमडाचे पाणी आज लुप्त झाले आहे.
रुमडाचे पाणी मिळवणे अतिशय कौशल्याचे व जोखमीचे काम असते. या पाण्याची चव चाखण्यासाठी सर्प हमखास येतो, असा समज ग्रामीण भागात असल्यामुळे रूमडाच्या झाडापासून पाणी मिळविताना अतिशय सावधगिरी बाळगावी लागते. या कामाची व कामातील जोखमीची सर्व माहिती असलेली व्यक्तीच हे काम करू शकते. नवखी व्यक्ती रूमडाचे पाणी मिळविण्याच्या फंदात सहसा पडत नाही.
पाणी मिळविण्यासाठी प्रथम एक रूमडाचे झाड हेरून त्याच्या आसपासची लहान-सहान झुडपे तोडून तो भाग साफ केला जातो. त्यानंतर या झाडाच्या ज्या पाळापासून पाणी मिळविणे सोयीस्कर असेल, त्या पाळाखाली सुमारे दीड फूट खोलीचा खड्डा खोदण्यात येतो. पाण्यासाठी ज्या आकाराचे भांडे वापरायचे असेल, त्या मापाचा अंदाज घेऊनच हा खड्डा खोदण्यात येतो. त्यानंतर रूमडाच्या पाळाला कोयत्याने तोडून मध्ये खाच केली जाते. एका कळशीचे तोंड फडक्याने बांधून ती पाळाच्या खाचाखाली खड्ड्यात ठेवण्यात येते. नंतर त्या पाळासहीत कळशीवर प्रथम पालापाचोळ्याचे आच्छादन करून ते दगड व मातीच्या साह्याने मजबूत केले जाते.
सर्पाला आत प्रवेश मिळू नये, हा यामागे उद्देश असतो. दुसऱ्या दिवशी अतिशय सावधगिरी बाळगत प्रथम कळशीवरील आच्छादन दूर करून पाण्याने भरलेली कळशी खड्ड्यांमधून अलगदपणे बाहेर काढली जाते.
कांजी, रूमड पेये नामशेष
उष्म्याने अंगाची लाही-लाही होऊन घामाच्या धारा वाहू लागल्या की, पूर्वी रूमडाचे पाणी हमखास काढले जायचे. आता जमाना बदलला आहे. बदलत्या जीवनशैलीत आधुनिकतेच्या हव्यासापोटी सर्वच बाबतीत पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्याचा अट्टाहास वाढीस लागला आहे. या अट्टाहासापायीच परदेशी कंपन्यांची बेचव व आरोग्यास अपायकारक शीतपेये घशात ओतली जात आहेत. बाजारात अतिक्रमण केलेल्या या बेगडी पेयांच्या भाऊगर्दीत कांजी, किंवा रूमडाच्या पाण्यासारखी शुद्ध, मधुर व शीतलपेये मात्र नामशेष होत आहेत.