Sindhudurg: १५ हजारांची लाच स्वीकारताना नेरूर वनपाल जाळ्यात, लाकूड परवाना पाससाठी लाचेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 11:53 AM2024-03-02T11:53:21+5:302024-03-02T11:53:44+5:30
कुडाळ : लाकूडतोडीचा वाहतुकीसाठीचा पास देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच लाकूड व्यावसायिकाकडून स्वीकारताना नेरुरपारचे वनपाल अनिल हिरामण राठोड (४९) ...
कुडाळ : लाकूडतोडीचा वाहतुकीसाठीचा पास देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच लाकूड व्यावसायिकाकडून स्वीकारताना नेरुरपारचे वनपाल अनिल हिरामण राठोड (४९) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवार १ मार्च रोजी सकाळी ११:४५ वाजता नेरूर वनपाल यांच्या कार्यालयात करण्यात आली, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. या घटनेनंतर वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे लाकूड व्यावसायिक असून नेरूरपार वनपाल यांचे कार्यालयात लाकूड वाहतुकीचा पास मिळावा यासाठी त्यांनी १५ फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता. लाकूडतोडीसह पास देण्यासाठी वनपाल यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारण्याचे राठोड यांनी मान्य केले होते.
या प्रकरणी संबंधित लाकूड व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग यांचेकडे २९ फेब्रुवारी रोजी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार शुक्रवारी सकाळी रोजी ११:४५ वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्गच्या पथकाने नेरूर वनपाल कार्यालय येथे सापळा रचला. तक्रारदाराकडून वनपाल राठोड यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनील लोखंडे, अपर पोलिस अधीक्षक महेश तरडे, सुधाकर सुराडकर, सिंधुदुर्गचे पोलिस उपअधीक्षक अरुण पवार यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात पोलिस निरीक्षक अमित पाटील, शिवाजी पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक भार्गव फाले, पोलिस हवालदार जनार्दन रेवंडकर, नीलेश परब, प्रथमेश पोतनीस, रविकांत पालकर, कांचन प्रभू, जितेंद्र पेडणेकर यांनी सापळा रचला.
तक्रारदार यांचेकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनपाल राठोड यांना रंगेहाथ पकडले. वनपाल राठोड यांना ताब्यात घेण्यात आले असून सांयकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी तपास काम व यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची पुढील कार्यवाही सुरू होती.