रत्नागिरीत रंगणार नवा ‘खुर्ची’ वाद
By admin | Published: June 12, 2015 11:23 PM2015-06-12T23:23:40+5:302015-06-13T00:13:19+5:30
साडेतीन वर्षांपूर्वी रत्नागिरी नगरपालिकेत सेना - भाजपा युती सत्तेत आल्यानंतर सव्वा वर्षांच्या टप्प्यात नगराध्यक्षपदाचे वाटप ठरले.
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेतील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. महेंद्र मयेकर यांचा सव्वा वर्षाचा कालावधी येत्या २४ जुलै रोजी संपत असल्याने ते राजीनामा देणार काय, याच प्रश्नाभोवती राजकारण फिरत असून, राज्यातील युती तुटलेली असताना रत्नागिरी पालिकेतील युती राहणार काय, याबाबत तर्कवितर्काना उधाण आले आहे, तर नगराध्यक्षपदासाठीच्या स्पर्धेतून आपसातील वाद विकोपास गेले आहेत. साडेतीन वर्षांपूर्वी रत्नागिरी नगरपालिकेत सेना - भाजपा युती सत्तेत आल्यानंतर सव्वा वर्षांच्या टप्प्यात नगराध्यक्षपदाचे वाटप ठरले. प्रत्येक पक्षाला दोनदा संधी मिळणार असे ठरविण्यात आले. प्रथम संधी अधिक नगरसेवक असलेल्या शिवसेनेला मिलिंद कीर यांच्या रुपाने मिळाली. त्यानंतर सलग अडीच वर्षांचा काळ नगराध्यक्षपद भाजपकडे आहे. येत्या २४ जुलैनंतर तरी हे पद सव्वा वर्षाचा हक्क असलेल्या शिवसेनेला मिळणार की नाही, याचीच चर्चा सुरू झाली आहे.
कोणत्याही स्थितीत सेनेकडे नगराध्यक्षपद राहू द्यायचे नाही, असे शिवसेनेच्या गोटातील वातावरण आहे. त्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठांकडूनही स्ट्रॅटेजी ठरवली जात आहे. सेनेतील इच्छुकांमध्येही या पदासाठी जोरदार स्पर्धा आहे. काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष व इच्छुक हे एकदिलाने सर्व कामे करीत असताना एका उद्यानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरूनही वादंग झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नगराध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या वादाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वादावर नेते कसा तोडगा काढतात याकडे लक्ष लागले आहे. मात्र यानिमित्ताने वाद विकोपाला गेले आहेत. (प्रतिनिधी)
कदमांच्या उद्याच्या दौऱ्याकडे लक्ष
शिवसेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्षपदाबाबत मूळमूळीत भूमिका घेतल्याने भाजपने वरचढ होत सेनेला नगराध्यक्षपदापासून वंचित ठेवल्याची चर्चा शिवसेनेत आहे. येत्या रविवारी शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम हे रत्नागिरीत येत असून, रत्नागिरी नगराध्यक्षपदाचा विषय त्यांच्या कोर्टात नेला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.