मालवण-दांडी बीच येथे सी वॉटर पार्कचा नवा अध्याय, पर्यटनाला मिळणार चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 04:02 PM2017-12-19T16:02:48+5:302017-12-19T16:09:44+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळाली. स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटकांसाठी सी वॉटर पार्कचा नवा अध्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी एकत्र येत एकजुटीतून दाखवलेले धाडस कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी केले.
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. पर्यटनाच्या बाबतीत मागासलेला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळाली. स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटकांसाठी सी वॉटर पार्कचा नवा अध्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी एकत्र येत एकजुटीतून दाखवलेले धाडस कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी केले.
मालवण-दांडी बीच येथे किल्ले सिंधुदुर्गच्या दर्शनी भागात स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी साकारलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या सी वॉटर पार्कचा शुभारंभ नीलेश राणे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला.
यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, परशुराम पाटकर, बाबा परब, अभय परब, आनंद शिरवलकर, वॉटर पार्कचे प्रणेते दामू तोडणकर, रुपेश प्रभू, विरेश लोणे, मंगेश सावंत, अन्वय प्रभू, विकी तोरसकर, अजित आचरेकर, नगरसेविका पूजा करलकर, ममता वराडकर, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, नगरसेवक दीपक पाटकर, अखिलेश शिंदे, गौरव प्रभू यांच्यासह पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.
सी वॉटर पार्क शुभारंभानंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. यावेळी तिकीट खिडकीवर पर्यटकांनी गर्दी केली. यावेळी स्थानिक नगरसेविकांनीही सी वॉटर पार्कचा आनंद लुटला. यावेळी आयोजकांच्यावतीने नीलेश राणे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन विकी तोरसकर तर आभार दामू तोडणकर यांनी मानले. गोवा राज्यापेक्षाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन सर्वोत्तम आहे. तरुणांनी साकारलेला वॉटर पार्क म्हणजे पर्यटकांप्रमाणे जिल्हावासीयांसाठी महत्त्वपूर्ण आहे. सी वॉटर पार्कमुळे पर्यटनाला अधिक चालना मिळेल असे संजू परब यांनी सांगितले.
मालवणवासीयांसाठी आनंदाचा क्षण
नीलेश राणे म्हणाले, नारायण राणे यांची स्थानिकांना पर्यटनातून रोजगार मिळावा आणि रोजगारातून सहकार निर्माण व्हावा, अशी संकल्पना होती. तीच संकल्पना व्यावसायिक दामू तोडणकर व त्यांच्या सहकाºयांनी सत्यात उतरविली आहे.
परदेशाप्रमाणे मालवणातही सी वॉटर पार्कचा पर्याय उपलब्ध झाला आहे. हा मालवणवासीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. पर्यटकांना आनंद लुटण्यासाठीही दांडी किनारी पोषक वातावरण आहे. तरुणांनी एकत्र येऊन पर्यटन क्षेत्रात मोठे धाडसाचे पाऊल टाकले आहे. भविष्यात तरुणांना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करू. तरुणांनी न थांबता व्यवसाय वाढवावा.
प्रशासन परवानगी नाकारत असेल तर हिसकावून घेऊ!
तरुणांनी मोट बांधून शासनाच्या मदतीची अपेक्षा न करता स्वत: पर्यटन व्यवसाय सुरु केले. मात्र, प्रशासनाकडे वारंवार परवानगी मागूनही अद्यापही जलक्रीडा प्रकारांना अधिकृत मंजुरी दिली जात नाही.
सी वॉटर पार्क साकारलेल्या प्रकल्पाची फाईल परवानगीसाठी दिली आहे. त्यावरही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून परवानगी नाकारली जात असेल तर आम्ही एकजुटीने परवानगी हिसकावून घेऊ, असे दामू तोडणकर यांनी सांगितले.