करुळ घाटातील संरक्षक भिंतीसह कॉंक्रीटचा नवीन रस्ता गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2024 09:32 PM2024-06-29T21:32:55+5:302024-06-29T21:33:22+5:30

घाटमार्गावर दरडीच दरडी : दर्जाबाबत शंका; पावसाळ्यात वाहतूक सुरु होण्याची शक्यता धूसर

new concrete road along with the protective wall at karul ghat has been vanished | करुळ घाटातील संरक्षक भिंतीसह कॉंक्रीटचा नवीन रस्ता गेला वाहून

करुळ घाटातील संरक्षक भिंतीसह कॉंक्रीटचा नवीन रस्ता गेला वाहून

प्रकाश काळे, लोकमत न्यूज नेटवर्क, वैभववाडी : दुपदरीकरणासह कॉंक्रीटीकरण सुरु असलेल्या करुळ घाटातील नव्याने बांधलेली संरक्षक भिंत आणि कॉंक्रीटचा रस्ताच पावसात वाहून गेला आहे. तसेच संपूर्ण घाटमार्गावर दरडीच दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या घाटमार्गाने वाहतुक सुरु होण्याची शक्यता धुसर बनली आहे. नव्याने बांधलेली भिंत आणि कॉंक्रीटचा रस्ता वाहून गेल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली आहे.

तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटमार्गाचे दुपदरीकरण व कॉंक्रीटीकरणासाठी २२ जानेवारीपासून मार्ग वाहतुकीस बंद आहे. ९.६ किलोमीटरच्या घाटमार्गापैकी सहा किलोमीटर लांबीचे कॉंक्रीटीकरण पुर्ण झाल्याचा दावा महामार्ग प्रधिकरणने केला आहे. तर संरक्षक भिंतीचे कामही करण्यात आले आहे. उर्वरित किरकोळ कामे पूर्ण करुन १ जुलैनंतर घाटमार्ग सुरु होईल, अशी अपेक्षा वाहनचालकांना होती. परंतु, सर्वांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे.

करुळ घाटरस्त्याला नव्याने बांधलेली संरक्षक भिंत पावसाच्या पाण्याने कोसळली आहे. केवळ भिंतच कोसळली नाही तर नव्याने कॉंक्रीटीकरण केलेला निम्मा रस्ताच वाहून गेला आहे. ५० मीटर लांबीची भिंत कोसळली असून तितकाच रस्ताही वाहून गेला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे कामाच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

दरम्यान, संपूर्ण घाटमार्गात दरडीच दरडी कोसळल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच कॉंक्रीटचा नवीन रस्ता पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वाहून गेला आहे. त्यामुळे करुळ घाटमार्गाने या पावसाळ्यात वाहतूक सुरु होण्याची शक्यता धुसर झाली आहे.

तीन चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाचे पाण्यामुळे संरक्षक भिंत कोसळली आहे. ही भिंत नव्याने बांधण्यास ठेकेदाराने सुरुवात केली आहे. रस्ताही नव्याने करण्यात येत आहे. - अतुल शिवनिवार, उपअभियंता,राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण.

करुळ घाट रस्त्याच्या कॉक्रीटीकरणासाठी सहा महिन्यापासून हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. परंतु या अत्यंत निकृष्ट कामामुळेच संरक्षक भिंत कोसळून रस्ताच वाहून गेला आहे. त्यामुळे आम्ही या कामाच्या चौकशीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करणार आहोत. महेश कदम, मनसे पदाधिकारी

Web Title: new concrete road along with the protective wall at karul ghat has been vanished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.