गृहसंकुलांसाठी नवीन अट
By admin | Published: June 26, 2015 11:41 PM2015-06-26T23:41:28+5:302015-06-27T00:15:57+5:30
जिल्हा परिषद : छतावरचे पाणी साठवणाऱ्यांना परवानगी देण्याचा ठराव
रत्नागिरी : उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई उद्भवत असल्याने यापुढे रेन हॉर्वेस्टिंगचा उपाय करणाऱ्यांनाच शहर परिसरातील ग्रामपंचायतींनी गृहसंकुलासाठी परवानगी द्यावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.पावसाचे प्रमाण जास्त असूनही दरवर्षी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पाणीटंचाई उद््भवते. जिल्हा परिषदेला दरवर्षी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करावी लागते. त्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. यावर लाखो रुपये खर्च करण्यात येतो. तरीही पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी कासावीस होते. जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यामध्ये ९८ गावांतील २२७ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु होती. या टंचाईग्रस्तांना केवळ २५ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. या टंचाईग्रस्तांना पाणी पुरवठा करताना शासनाची दमछाक झाली होती. दरवर्षी उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून आणखी किती गावांना पाणी पुरवठा करणार, याचाही विचार करणे आवश्यक आहे. शहराच्या आजूबाजूच्या परिसरातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील लोकवस्ती वाढत आहे. त्यामुळे जागेचे भावही वधारल्याने सर्वसामान्यांना ते परवडणे आवाक्याबाहेरचे झाले आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात बिल्डर्सकडून गृहसंकुलांची उभारणी करण्यात येत आहे. वाढत्या लोकवस्त्यांना ग्रामपंचायतींकडून पाणी पुरवठा करणे अवघड होत आहे. या गृहसंकुलांची निर्मिती करताना त्यापूर्वी पाण्याची सोय करणे आवश्यक आहे. पाणी साठवण्यासाठी रेन हॉर्वेस्टिंग हा उपाय केल्यास गृहसंकुलातील रहिवाशांची काही प्रमाणात पाण्याची सोय करता येणार आहे. त्यासाठीच जिल्हा परिषदेने शहर परिसरातील ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये गृहसंकुल बांधतांना रेनहॉर्वेस्टिंगचा उपाय करणाऱ्यांनाच बांधकामाची परवानगी देण्यात यावी, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बिल्डर्संना गृहसंकुल बांधतांना रेनहॉर्वेस्टिंगची उपाय करणे आवश्यक असून, ते रहिवाशांच्या फायद्याचे ठरणार आहे. रहिवाशांना फायद्याचा असा हा नियम जिल्हापरिषदेने ठरावाद्वारे पारीत केला असल्याने ग्रामीण भागातील बांधकामे करताना संबंधितांना हे भान ठेवावे लागणार आहे. हा नवा प्रयोग किती यशस्वी ठरतो हे येणारा काळच ठरविणार आहे मात्र सध्या तरी अशा बांधकामांना महत्वाचा हा नियम पाळावाच लागणार आहे. या साऱ्यावर अंकूश ठेवण्यासाठी मात्र विशेष प्रयत्न करावे लागतील हे नक्कीच. या साऱ्या अंमलबजावणीकडे लक्ष लागणार आहे. (शहर वार्ताहर)
छतावरचे पाणी बरेच काही देणार...
1पावसाळ्यात छतावरचे पाणी साठवून त्याचा वापर करण्याचा उपाय सर्व गृहसंकुलांनी केल्यास त्याचा टंचाईच्या कालावधीत मोठा फायदा होईल. जिल्हा परिषदेच्या या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास टंचाईच्या कालावधीत मोठा फायदा होणार आहे. अर्थातच अंमलबजावणीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
2घर बांधणीसाठी परवानगी देताना आता काही ग्रामपंचायतीही पाण्याच्या सोयीबाबत खबरदारी घेत आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून घर बांधणीसाठी परवानगी मागणाऱ्या जमीन मालकाकडून नळ कनेक्शन मागणार नाही, असे त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतात. त्यामुळे घर बांधण्याआधीच जमीन मालकांने पाण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
3उदय बने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी परिषद भवनाच्या आवारामध्येच रेन हार्वेस्टींग करण्याच्या दृष्टीने पावले उचलली होती. मात्र, वर्षभरानंतर प्रशसनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने पाण्याची टाकी व त्याला जोडण्यात आलेले पाईपची विल्हेवाट लागली.