बंदर विकासातून रोजगाराचे नवे दालन
By admin | Published: October 13, 2016 09:30 PM2016-10-13T21:30:58+5:302016-10-13T21:30:58+5:30
रवींद्र चव्हाण : तळवडेत ग्रामस्थांकडून सत्कार; विकासासाठी मतदभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहनतळवडे :
सिंधुदुर्ग जिल्ह्याला बंदर -विकास होणे गरजेचे आहे, हे ओळखून जिल्ह्यातील बंदर विकास व रेल्वेलाईन बंदरापर्यंत जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने शासनाने पावले उचलली आहेत. त्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यटन विकास व रोजगाराचे नवे दालन निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तळवडे येथील कार्यक्रमात व्यक्त केले.
तळवडे येथील दसरोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात रवींद्र चव्हाण बोलत होते. यावेळी तळवडेचे सरपंच पंकज पेडणेकर, उदय परब, दिलीप परब, संदीप परब, प्रणय परब, संजय परब, अनिल परब, रवींद्र परब, सुनील परब, अशोक परब, मकरंद परब, प्रमोद परब, सुधाकर परब, अरविंद परब, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, चौपदरी महामार्ग निर्माण करताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची दखल राज्यशासन घेत आहे. यात बऱ्याच अडचणी येत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व मतभेद विसरून एकत्र या, असे आवाहनही त्यांनी केले. तळवडे गावाशी माझे अतूट नाते आहे. या गावात मी वाढलो. मी कोकणचा सुपुत्र आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा विकास साधणे हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी थळकर परब बंधूंतर्फे रवींद्र चव्हाण यांचा त्यांचे मामा गणपत परब, बाळकृष्ण परब, मधुकर परब, लक्ष्मण परब, दिलीप परब यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)