रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी नवे शैक्षणिक धोरण

By admin | Published: December 15, 2015 09:54 PM2015-12-15T21:54:50+5:302015-12-15T23:24:05+5:30

मुंबई विद्यापीठाचा बृहत आराखडा : महाविद्यालयीन व व्यावसायिक उच्च शिक्षणाचा अनुशेष भरणार

New educational policy for Ratnagiri, Sindhudurg | रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी नवे शैक्षणिक धोरण

रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी नवे शैक्षणिक धोरण

Next

रत्नागिरी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोकणातील समुद्रकिनारी व दुर्गम प्रदेशामध्ये विस्तारलेल्या जिल्ह्यांमध्ये महाविद्यालयीन व व्यावसायिक उच्च शिक्षणाचा अनुशेष आहे. तोच दूर करून व रत्नागिरी उपकेंद्र व आयडॉल यांची सांगड घालतानाच येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून या दोन जिल्ह्यांमध्ये नवीन पदवी, पदव्युत्तर महाविद्यालये सुरु करण्यासंबंधीचा प्रस्ताव बृहत आराखड्यात करण्यात आला आहे. यामध्ये विशेषत: अनेक वर्षांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांकरिता खास शैक्षणिक धोरण समाविष्ट करण्यात आले आहे. यातून रत्नागिरी, सिंधुदुर्गात सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध होणार आहे.
मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०१६-१७ च्या बृहत आराखड्यास नुकतीच सिनेट बैठकीमध्ये मान्यता दिली आहे. त्यानंतर हा नवा आराखडा विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. ज्यांना नवीन महाविद्यालयांसाठी अर्ज करायचे आहेत, त्यांनी ३१ डिसेंबरपूर्वी विहीत नमुन्यात करण्याची सूचनाही यात करण्यात आली आहे.या बृहत आराखड्यामध्ये सन २०१६-२०१७ या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील व्यावसायिक व इतर अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता दिली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात १ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, १ विधी महाविद्यालय, रत्नागिरी शहरामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान रात्र महाविद्यालय, महिला महाविद्यालय, ललित कला व कला विषयांतर्गत फाईन आटर््स (नृत्य, संगीत, पेंटिंग) १ महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय १, शहरामध्ये स्थापत्यशास्त्र महाविद्यालय १, तसेच पदव्युत्तर शिक्षणासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये व्यवस्थापन महाविद्यालय, तर औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय १ (चिपळूण, संगमेश्वर तालुके वगळून अन्यत्र) तसेच भारतीय रेल्वे महामंडळ, कोकण रेल्वे व मुंबई विद्यापीठ यांच्यातील सामंजस्य करारातून रत्नागिरी विद्यापीठ उपकेंद्रामध्ये पदव्युत्तर रेल्वे इनोव्हेशन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी सेंटरच्या माध्यमातून एम. टेक. किंवा एम. ई. रेल्वे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, रेल्वे सिव्हील इंजिनिअरिंग, रेल्वे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असे कोर्सेस सुरु करण्यात येणार आहेत.तसेच जिल्ह्यामध्ये २० किलोमीटरच्या अंतरामध्ये महाविद्यालय नसेल तर नवीन महाविद्यालय सुरु करण्याला परवानगी दिली जाणार आहे. तसेच मास्टर इन लॉ (एलएलएम) अभ्यासक्रमही मुंबई, ठाणे व इतर जिल्ह्यातही सुरु करण्यासंबंधी प्रस्तावाधिन आहे. तसेच ‘आयडॉल’ लॉ अधिक सक्षम करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात आली असून, त्यामध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यासंदर्भात अभ्यास मंडळाची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामध्ये दिग्गज, तज्ज्ञांचाही समावेश आहे. आयडॉलच्या माध्यमातून ललित कला व कला विषयाचे अभ्यासक्रम रत्नागिरी, सिंधुदुर्ग राबवले जाणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये वेगाने वाढणाऱ्या उद्योग क्षेत्रासाठीही कुशल मनुष्यबळ निर्माण करणारे आणि कृ षी उत्पादनांशी निगडीत प्रक्रिया संबंधित अभ्यासक्रमही सुरु करण्यात येणार आहेत. तसेच रोजगाराच्या निर्मितीसाठी अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत.
रत्नागिरी - सिंधुदुर्गला विस्तीर्ण सागरी किनारा व डोंगराळ प्रदेश फलोत्पादन लाभल्याने खासकरून याविषयी कृषी व फलोत्पादन केंद्र तसेच विद्याशाखा सिंधु स्वाध्याय इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ओशनोग्राफी, फिशरीज, मरीन बायोलॉजीकल, अ‍ॅक्वाकल्चर, कल्टिवेशन बांबू आणि केनिंग इंडस्ट्री, फायर सेफ्टी मॅनेजमेंट पॉवर्टी मॅनेजमेंट, क्रीडा व्यवस्थापन कोर्स, फुडस् प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, इको - टुरिझम, जैवविविधता कॉन्झर्वेशन कोर्ससारखे पदवीपूर्व अभ्यासक्रमही राबविण्याचे प्रस्तावित आहे.
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या पदवीपूर्व स्तरावर कुशल मनुष्यबळ व रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी अभ्यासक्रम राबविण्याच्या विचाराधीन आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध अभ्यासक्रम आयोजित करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहणार आहे. (प्रतिनिधी)


सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली ती पुढीलप्रमाणे - कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय १, विधी १, रात्र कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय १, महिला कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय १, अभियांत्रिकी १, ओरोसला स्थापत्य शास्त्र महाविद्यालय १, तसेच औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय १ (सावंतवाडी वगळून इतरत्र) अशी आहेत. यामधून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून रेल इनोव्हेशन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी सेंटर, फाईन आर्टस, कला, वाणिज्य, विज्ञान, कृ षी व फलोत्पादन केंद्र, स्थापत्यशास्त्र, व्यवस्थापन, विधीसारखे अभ्यासक्रम सुरु होणार आहेत.

मुंबई विद्यापीठाने विविध शिक्षणविषयक उपक्रम यंदा हाती घेतले आहेत. त्याचा मास्टर प्लान आखण्यात येत आहे. त्यामधून सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध होणार आहे. त्याकरिता नवे अभ्यासक्रम अंतर्भूत करण्यात येणार आहेत. रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये नवीन महाविद्यालये सुरु करण्यात येणार आहेत, त्यातून शैक्षणिक प्रगती होईल.
- डॉ. संजय देशमुख,
कुलगुरू, मुंबई विद्यापीठ



आलेख उंचावणार
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन महाविद्यालये सुरू करण्याबरोबरच नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातून दोन जिल्ह्यांचा शैक्षणिक आलेख उंचावण्यास मदत होणार आहे. दोन जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: New educational policy for Ratnagiri, Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.