मत्स्यशेतीतून रोजगाराची नवी दालने - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 07:48 PM2018-12-03T19:48:01+5:302018-12-03T19:48:53+5:30
सिंधुदुर्गात पर्यटन वाढीसोबत शासनाने मत्स्यशेतीबाबत धोरण आखणे आवश्यक आहे. जिल्ह्याचे अर्थकारण बदलणा-या मत्स्यशेती व्यवसायाकडे उद्योजक वळत आहे.
मालवण : सिंधुदुर्गात पर्यटन वाढीसोबत शासनाने मत्स्यशेतीबाबत धोरण आखणे आवश्यक आहे. जिल्ह्याचे अर्थकारण बदलणा-या मत्स्यशेती व्यवसायाकडे उद्योजक वळत आहे. त्यामुळे शासनाने शेती करण्यास उपयुक्त नसलेल्या जमिनी मत्स्यशेतीच्या वापरासाठी आणाव्यात. येथील सिंधुदुर्ग बँकेने मत्स्य उद्योजकांना अर्थसाहाय्य करण्याची चांगली भूमिका घेतली आहे. त्याप्रमाणे शासनानेही धोरण निश्चित केल्यास मत्स्यशेतीतून रोजरागाराची नवी दालने निर्माण होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग दौ-यावर असलेल्या शरद पवार यांनी देवली येथील उदय फार्म मत्स्य शेती केंद्राला भेट देत कोळंबी प्रकल्पाचा आढावा घेत माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, प्रदेश चिटणीस व्हिक्टर डॉन्टस, नगरसेवक अबिद नाईक, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्ष विश्वास साठे, आगोस्तीन डिसोजा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, विनोद आळवे, बाबू डायस, किरण रावले आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह जिल्हा बँकेचे अधिकारी अनिरुद्ध देसाई, लोकेगावकर, दयानंद चव्हाण तसेच विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी येथे आहे ते नागपूर येथे हलविण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा मत्स्य व्यवसायच्या शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे ते हलवू नये. शिवाय कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ देण्यात यावे अशी मागणी मत्स्य महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आली. याप्रश्नी लोकसभेत अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधू असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले.
पवारांची बोटिंग सफर
पवार यांनी आपल्या नातवांसोबत सोमवारी सकाळी देवबाग येथून बोटीने खाडीपात्रातून बोटिंग सफर केली. त्यानंतर त्यांनी बोटीनेच देवली गाठली. देवली गावात पवार यांचे राष्ट्रवादी तसेच ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी कोळंबी प्रकल्पाची पाहणी करत माहिती घेतली. यावेळी जिल्हा बँक, काँग्रेस तसेच अन्य संस्थाच्यावतीने पवार यांचे स्वागत करण्यात आले.
पर्यटन व्यावसायिकांचा सत्कार
पर्यटन क्षेत्रात योगदान देणा-या देवबाग, तारकर्ली येथील पर्यटन व्यावसायिकांचा जिल्हा बँकेच्यावतीने शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात राजन कुमठेकर, प्रफुल्ल मांजरेकर, श्रीकृष्ण तळवडेकर, मनोज खोबरेकर, सुरेश नेरूरकर, गणेश मिठबावकर या पर्यटन व्यावसायिकांना सन्मानपत्र, शाल-श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर कुडाळ येथील विधी महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पवार यांनी सत्कार केला. त्यानंतर पवार यांनी मालवण चिवला बीच येथे जलक्रीडा व्यवसायाचा फित कापून शुभारंभ केला. त्यानंतर त्यांनी मालवणी मेजवानीचा आस्वाद भाई कासवकर यांच्या निवासस्थानी घेतला.