कुडाळमध्ये नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी
By admin | Published: October 15, 2016 11:15 PM2016-10-15T23:15:33+5:302016-10-15T23:15:33+5:30
सभापतींसह दीपश्री नेरुरकरनाच संधी : नव्या उमेदवारांच्या शोधात पक्ष पदाधिकारी; युतीवरही ठरणार सत्तेची गणिते
रजनीकांत कदम ल्ल कुडाळ
कुडाळ पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीमधील जाहीर झालेल्या मतदारसंघनिहाय आरक्षणाने प्रस्थापित उमेदवारांचे पत्ते कट झाले आहेत. नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असून, या पंचायतीवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आरक्षण जाहीर झाल्याने उमेदवारांचीही आता भाऊगर्दी वाढू लागली आहे, पण योग्य उमेदवार देण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची कोंडी होत असून सक्षम उमेदवारांसाठी पदाधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे. शिवाय युतीबाबतही संभ्रम दिसत आहे.
कुडाळ पंचायत समिती ही १८ गणांची असून, जिल्ह्यातील तशी मोठी पंचायत समिती आहे. २०१२ साली झालेल्या निवडणुकीत याठिकाणी पहिल्यांदा शिवसेना व राष्ट्रवादी यांनी युती करीत निवडणूक लढविली होती. काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविली होती. या १८ जागांच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे १० उमेदवार निवडून आले होते. यामध्ये शिवसेनेचे ६, तर राष्ट्रवादीचे ४ उमेदवार होते, तर काँग्रेसचे ८ उमेदवार निवडून आले होते. गत निवडणुकीच्या निकालाचे चित्र पाहता शिवसेना व राष्ट्रवादी युतीची सत्ता या ठिकाणी प्रस्थापित झाली होती. या ठिकाणी या युतीच्यावतीने सभापतिपदी कुडाळ दक्षिण भाग मतदारसंघातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या शिल्पा घुर्ये यांची, तर उपसभापतिपदी शिवसेनेकडून झाराप मतदारसंघातून विजयी झालेले शंकर बोभाटे यांची वर्णी लागली होती.
अडीच वर्षांनंतर या ठिकाणी सभापती निवडीवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी काँग्रेस उमेदवारांसोबत आघाडी केली. त्यामुळे येथील सत्तेची गणिते बदलली व येथे काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली. घावनळे मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेल्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा घावनळकर यांची, तर नेरूर कर्यात नारूर मतदारसंघातून विजयी झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार आर. के. सावंत यांची उपसभापतिपदी वर्णी लागली. त्यामुळे या पाच वर्षांत या पंचायत समितीत शिवसेना-राष्ट्रवादी युतीची सत्ता तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीची सत्ता या दोन्हीही सत्ता समान अडीच वर्षांच्या कालावधीसाठी होत्या. त्यामुळे आता पुढील पाच वर्षांकरिता येथील मतदार कोणाच्या पाठीशी ठाम राहणार आहेत, हे येत्या निवडणुकीत समजणार आहे.
सध्या कुडाळ पंचायत समिती आरक्षण याप्रमाणे आहे - आंब्रड-सर्वसाधारण, जांभवडे- सर्वसाधारण, आवळेगांव-नामाप्र महिला, वेताळबांबर्डे-सर्वसाधारण महिला, ओरोस बुद्रुक- नामाप्र सर्वसाधारण, कसाल- नामाप्र सर्वसाधारण, डिगस- सर्वसाधारण, पावशी- अनुसूचित जाती सर्वसाधारण, नेरूर (उत्तर)- सर्वसाधारण, नेरूर (दक्षिण)- सर्वसाधारण महिला, पाट- सर्वसाधारण, तेंडोली- नामाप्र महिला, पिंगुळी- नामाप्र महिला, साळगांव- सर्वसाधारण, घावनळे- सर्वसाधारण महिला, गोठोस- सर्वसाधारण महिला, माणगाव- सर्वसाधारण महिला, झाराप- सर्वसाधारण महिला.
दरम्यान, या नव्या आरक्षणाने विद्यमान सदस्यांपैकी अनेकांचे पत्ते कट झाले आहेत. दीपश्री नेरुरकर यांना जर तिकीट मिळाले तर संधी आहे. त्यामुळे आगामी पंचायत समितीसह जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये नव्या उमेदवारांचा शोध घेण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली आहे. शिवाय तळ्यात-मळ्यात करणाऱ्यांचीही डोकेदुखीही पक्षांना सहन करावी लागत आहे. (प्रतिनिधी)
सभापतींसह दीपश्री नेरूरकर यांनाच संधी
कुडाळ पंचायत समिती आरक्षण जाहीर झाल्यानंतरची स्थिती पाहता विद्यमान सदस्यांना त्याच मतदारसंघात बदललेल्या आरक्षणामुळे संधी मिळणार नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. फक्त प्रतिभा घावनळकर व दीपश्री नेरूरकर यांना पक्षाने संधी दिल्यास त्यांना त्यांच्याच मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढविण्याची संधी मिळू शकते.
नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी
आरक्षणाच्या स्थितीमुळे प्रत्येक मतदारसंघात नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. तसेच प्रभाग रचनेतही मोठ्या प्रमाणात बदल झाल्यानेही प्रत्येक पक्षाला मते मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार, हे मात्र निश्चित. तसेच कुडाळ शहरात नगर पंचायत झाली असल्याने या ठिकाणी आता पंचायत समिती मतदारसंघ नसणार आहे.