नव्या पॅसेंजरची वेळ गैरसोयीची

By admin | Published: April 2, 2015 09:18 PM2015-04-02T21:18:56+5:302015-04-03T00:46:06+5:30

कोकण रेल्वे : जनतेच्या तोंडाला पाने पुसल्याचीच स्थिती-- समस्या कोकण रेल्वेची - भाग १

New passenger time is inconvenient | नव्या पॅसेंजरची वेळ गैरसोयीची

नव्या पॅसेंजरची वेळ गैरसोयीची

Next

रजनीकांत कदम - कुडाळ --कोकण रेल्वेच्या मार्गावर कोकणातील व गोव्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू केलेल्या मडगाव-रत्नागिरी पॅसेंजर या रेल्वेचे वेळापत्रक पाहता ही रेल्वे खरोखरच प्रवाशांच्या फायद्याची ठरेल काय, असा प्रश्न निर्माण होत असून, या रेल्वेचे वेळापत्रक पाहता पुन्हा एकदा कोकण रेल्वे प्रशासनाने येथील जनतेच्या तोंडाला पाने पुसल्याचे चित्र दिसून येत आहे. गेली अनेक वर्षे रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व गोवा राज्यातील जनतेची स्वतंत्र मडगाव- रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी मागणी होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी दादर-रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे म्हणून कोकण रेल्वेने सुरू केली असून, या रेल्वेचा प्रारंभ केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मडगाव येथे केला. मात्र, या रेल्वेचा खरोखरच प्रवाशांना फायदा होईल काय, हे पाहणे गरजेचे आहे. कारण रत्नागिरी प्रवाशांकरिता सोडण्यात आलेली दादर-रत्नागिरी ५०१०३ पॅसेंजर ट्रेन रत्नागिरीसाठी मर्यादित न ठेवता २०१३ च्या रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या रत्नागिरी-मडगाव या नवीन गाडीच्या गोंडस नावाखाली रेल्वे मंत्रालयाच्या आदेशाचा आधार घेऊन दादर -रत्नागिरी हीच ५०१०३ पॅसेंजर ट्रेन रत्नागिरी-मडगाव ५०१०१ या नंबरने मडगावपर्यंत सोडून कोकण रेल्वे प्रशासन महाराष्ट्रातील कोकण रेल्वेचे अस्तित्व गोवा राज्यात प्रस्थापित करून रेल्वे बोर्डाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करीत आहेत, असे मत बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे उमेश गाळवणकर यांनी व्यक्त केले आहे.
ही दादर-रत्नागिरी ५०१०३ पॅसेंजर ट्रेन रत्नागिरी येथे रात्री २४.१५ वाजता येईल व २४.१५ ते ०३.२० पर्यंत रत्नागिरीत थांबून हीच ट्रेन ५०१०१ या नंबरने ०३.२० ला मडगावला रवाना होईल. मडगाव येथे सकाळी ०९.५० ला पोहोचेल व मडगाव येथे या गाडीचा मेन्टर्न्स होऊन हीच गाडी ५०१०२ या नंबरने १९.१० वाजता मडगाव येथून रवाना होईल व रत्नागिरी येथे ००.१५ वाजता पोहोचेल. ००.१५ ते ०५.५० पर्यंत रत्नागिरी येथे थांबून ५.५० ला रत्नागिरी येथून दादरसाठी रवाना होईल. २०१३ च्या रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या रत्नागिरी-मडगाव या नवीन गाडीसाठी तीन डब्यांची (पूर्वीप्रमाणे) स्वतंत्र गाडी सोडता आली असती; पण १८ डब्यांची गाडी रात्री ०३ वाजता सोडून १ दिवस मडगावला फिरवून आणून तोट्यात असलेल्या रेल्वेला अजून तोट्यात का घालण्यात येत आहे? दादर-रत्नागिरी गाडी रत्नागिरीत थांबून पुन्हा रत्नागिरीतूनच सुटत असल्यामुळे त्या गाडीचा मेंटनन्स रत्नागिरीतल्या डेपोतच होत होता.
आता गाडी थांबतच नसल्यामुळे व या गाडीचा मेंटनन्स मडगाव येथे होणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे भविष्यात रत्नागिरी येथील मेंटनन्स डेपो गोव्यात स्थलांतरित करून कोकण रेल्वे प्रशासन कोकण रेल्वेचे मुख्यालय मडगाव येथे करण्याच्या दृष्टीने डाव रचत आहे. भविष्यात रत्नागिरीसाठी असलेली गाडी मडगाव येथे नेऊन मडगाव येथून मुुख्यालय मडगाव येथे करण्याच्या दृष्टीने डाव रचत आहे.


रेल्वेफेरी दिवसाची आवश्यक
मडगाव-रत्नागिरी पॅसेंजर ही स्वतंत्र रेल्वे कोकण रेल्वेने देणे गरजेचे असून, ती सकाळी रत्नागिरीहून किंवा मडगावहून सुटणे गरजेचे आहे व दुपारी पुन्हा ती माघारी फिरणे गरजेचे आहे.
तरच या रेल्वेचा फायदा रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व गोवा राज्यातील प्रवाशांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे.
रत्नागिरीच्या नंतर काही रेल्वेस्थानकांवर ही गाडी पहाटे ४.४५ व ६.०० वाजता येणार आहे. या वेळेत कोणत्या प्रवाशांना याचा फायदा होणार, हा प्रश्न पडत असून, कोकण रेल्वे मात्र ही पॅसेंजर तोट्यात चालवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


पहाटे तीन वाजता प्रवासी मिळणार का?
भविष्यात रत्नागिरीसाठी असलेली गाडी मडगाव येथून परत येताना जर भरून आली, तर रत्नागिरीच्या प्रवाशांनी काय करावे, हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. १८ डब्यांची ट्रेन पहाटे ३.२० वाजता मडगाव येथे जात असताना पहाटे
३ वाजता प्रवासी मिळणार का, याचे उत्तर आजच्या क्षणाला नाही.

Web Title: New passenger time is inconvenient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.