नवख्यांना मंत्री केले, मग नारायण राणेंना का डावलले?, डॉ.जयेंद्र परूळेकर यांचा सवाल
By अनंत खं.जाधव | Published: June 11, 2024 01:30 PM2024-06-11T13:30:07+5:302024-06-11T13:32:31+5:30
'राणेंना मंत्री करणार म्हणून सांगून राज ठाकरे, दीपक केसरकर यांनी मते मागितली आता काय झाले'
सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या नारायण राणे यांना डावलून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्ष नेतृत्वाने राणेंसह अवघ्या कोकणी जनतेचा अपमान केला, अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून केली आहे.
त्या ठिकाणी मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसे यांसारख्या अनुभवाने कमी असलेल्या खासदारांना मंत्रिपद देण्यात आले. मात्र राणेंना त्या ठिकाणी संधी देण्यात आली नाही. याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
डाॅ.परूळेकर म्हणाले,पंतप्रधान मोदी यांचा शपथविधी दिल्ली येथे पार पडला. यावेळी मोदींसोबत भाजप व एनडीएच्या ७२ जणांनी मंत्रीपदी आणि राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र या सोहळ्यात सिंधुदुर्ग- रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला आहे. साडेचार लाख मते देऊन येथील जनतेने लोकसभेत पाठवलेल्या माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंत्रिपद नाकारून मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाने कोकणातील जनतेचा अवमान केलेला आहे.
मोहोळ आणि खडसे सारख्या अनुभवाने कमी असलेल्या खासदारांची वर्णी मात्र मंत्रीपदासाठी माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री राहीलेल्या नारायण राणे यांना डावलून मोदी आणि पक्षनेतृत्वाने राणेंचा आणि येथील जनतेचा अपमानच केलेला आहे, राणेंना मंत्री करणार म्हणून सांगून राज ठाकरे, दीपक केसरकर यांनी मते मागितली आता काय झाले असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.