रखडलेल्या प्रकल्पांसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक : राजेश क्षीरसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 11:32 AM2019-06-22T11:32:34+5:302019-06-22T11:34:35+5:30
निधीअभावी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढील आठवड्यात मुंबईत बैठक घेतली जाईल. कोल्हापुरातील प्रश्नांसंदर्भात माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनाही या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. नियोजन आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी आणू, अशी ग्वाही राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : निधीअभावी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढील आठवड्यात मुंबईत बैठक घेतली जाईल. कोल्हापुरातील प्रश्नांसंदर्भात माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनाही या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. नियोजन आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी आणू, अशी ग्वाही राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, आदी प्रमुख उपस्थित होते.
क्षीरसागर म्हणाले, आपल्याला हे पद देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फार मनावर घेतले. त्यांनी याची जबाबदारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर सोपविली होेती. अवघ्या दोन तासांत आपल्याला ही जबाबदारी मिळाली. ही मोठी जबाबदारी असून, ती सक्षमपणे पेलून सर्वांच्या विश्वासात पात्र ठरण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. राज्य नियोजन मंडळाची प्रमुख उद्दिष्टे असणारे विषय अभ्यासपूर्वक हाताळून नियोजन आयोगाचे काम पारदर्शी ठेवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. पाणंद विकासासाठी, तसेच राज्याच्या १२५ तालुक्यांत मानव विकासासाठी निधी दिला जाईल.
ते पुढे म्हणाले, रखडलेल्या प्रकल्पासंदर्भात पुढील आठवड्यात मुंबईत बैठक घेतली जाणार आहे. यावेळी प्रधान सचिव यांच्यासह संबंधित विभागांचे सचिव उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात माहिती होण्यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनाही बोलविण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यासाठी नियोजनच्या माध्यमातून दोन ते तीन महत्त्वाचे कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये शहरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रंकाळा सुशोभिकरण करणे, याबरोबरच राजाराम, कोटीतीर्थ तलावांचेही सुशोभिकरण करणे, अॅमेझिंग पार्क उभारणे, तसेच ग्रामीण भागात गडकिल्ल्यांमध्ये ट्रेकिंगची सुविधा करणे, सार्वजनिक बांधकामसह राष्ट्रीय महामार्गचे रस्ते भक्कम करण्यावर भर देणे, असे उपक्रम हाती घेतले जातील.
विकासकामांसाठी ४४ कार्यासने
विभागाची सर्व एकत्रित कामे पार पाडण्यासाठी प्रधान सचिव (नियोजन) व प्रधान सचिव (रोहयो) यांच्या अंतर्गत सर्व योजनांचे नियोजन केले जात आहे. नियोजन विभागातील सर्व विकासाची कामे पाहण्यासाठी ४४ कार्यासने कार्यरत आहेत.
विकासकामांना अडथळे आणू नयेत
थेट पाईपलाईनसंदर्भातील सर्व शासकीय अडथळे आम्ही दूर केले आहेत. आता काही लोकांकडून अडथळे येत आहेत. त्यांना विनंती आहे की विकासकामांसाठी अडथळ्याऐवजी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन क्षीरसागर यांनी केले.
महापालिकेतील विकासकामांना विरोध नको
विकासकामांना विरोध केल्याने २४ कोटींचा निधी महापालिकेतून परत गेला आहे, याकडे क्षीरसागर यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, नगरसेवकांनी अशी भूमिका घेऊ नये. परत गेलेला निधी मागे आणण्याचा प्रयत्न राहणार आहे.
==========================
कोल्हापूरचा नियतव्य कमी
कोल्हापूर जिल्ह्याचा नियतव्यय साताऱ्यापेक्षाही कमी आहे. यामध्ये लक्ष घालून बजेट वाढवून देण्याचा व जास्तीत जास्त निधी कोल्हापूरला आणण्याचा प्रयत्न राहील, असे क्षीरसागर यांनी सांगितले.
============================
(प्रवीण देसाई)