निधी गोवेकरला विजेतेपद
By admin | Published: November 13, 2015 10:54 PM2015-11-13T22:54:10+5:302015-11-13T23:38:28+5:30
रांगोळी स्पर्धा : श्री देव गांगेश्वर मित्रमंडळाच्यावतीने आयोजन
कणकवली : श्री देव गांगेश्वर मित्र मंडळातर्फे दीपावलीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांपैकी रांगोळी स्पर्धेत कणकवली शहरातील गांगोवाडी येथील निधी नीलेश गोवेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.
गेली २0 ते २५ वर्षे गांगेश्वर मित्रमंडळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या मंडळाच्यावतीने दीपावलीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दीपावली २0१५चे उद्घाटन मंगळवारी गांगो मंदिरात पार पडले. यावेळी खमंग फराळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतही महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. तसेच या स्पर्धेनंतर गुरुवारी रांगोळी स्पर्धा आणि आकाश कंदील स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेलाही स्पर्धकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. आकाश कंदिल स्पर्धेत तसेच रांगोळी स्पर्धेत मिळून ९0 स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
रांगोळी स्पर्धेचे परीक्षण रविकिरण शिरवलकर यांनी केले. तर आकाश कंदील स्पर्धेचे परीक्षण ब्रिजेश लिंगुडकर यांनी पाहिले.
साईबाबांची कलाकृती साकारलेल्या निधी नीलेश गोवेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर मिठाचा वापर करुन काढलेल्या ज्योती चौकेकर हिच्या रांगोळीला व्दितीय क्रमांक मिळाला. उत्तेजनार्थ म्हणून मनिष कडुलकर आणि भाग्यश्री परब यांनी यश मिळविले. (प्रतिनिधी)