आंजिवडे घाटासंदर्भात विनायक राऊतांनी केली ग्रामस्थांची फसवणूक, नीलेश राणेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 05:52 PM2022-06-28T17:52:59+5:302022-06-28T17:53:37+5:30
नीलेश राणे यांनी आपण याबाबत राज्यस्तरावर, केंद्रस्तरावर जमेल तेवढा प्रयत्न करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून रस्ता पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
कुडाळ : माजी खासदार नीलेश राणे यांनी काल, सोमवारी माणगाव खोऱ्यातील आंजिवडे घाटाची पाहणी केली. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी आंजिवडेवासीयांची फसवणूक केल्याचा आरोप केला. तसेच पत्रकारांशी बोलताना खासदार विनायक राऊत हे खोटे बोलत असल्याचा आरोपही यावेळी केला.
यावेळी माजी सभापती मोहन सावंत, कुडाळ मंडल अध्यक्ष विनायक राणे, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, ओबीसी जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, आनंद शिरवलकर, योगेश बेळणेकर, राजा धुरी, रुपेश कानडे, राजन भगत, कृष्णा पंधारे, दत्ता कोरगावकर, आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत यांनी याठिकाणी समितीमार्फत पाहणी केली जाईल, असे आश्वासन स्थानिकांना दिले होते. मात्र, आंजिवडे घाटाची पाहणी करण्यासाठी अद्यापपर्यंत कोणतीही कमिटी दाखल झाली नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
यावेळी स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेत राणे यांनी या घाट रस्त्यासंदर्भात माहिती घेतली. मुसळधार पावसातही बहुसंख्येने ग्रामस्थ या दौऱ्यावेळी उपस्थित होते.
माजी खासदार नीलेश राणे यांनी आपण याबाबत राज्यस्तरावर, केंद्रस्तरावर जमेल तेवढा प्रयत्न करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून रस्ता पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.