निरवडेत आंबा, काजू बागा खाक
By admin | Published: April 27, 2016 09:24 PM2016-04-27T21:24:43+5:302016-04-27T23:23:11+5:30
सहा लाखांचे नुकसान : गावठी बॉम्ब फुटल्याने आग लागल्याचा ग्रामस्थांचा संशय; काढणीवेळी आंब्याचे नुकसान
तळवडे : निरवडे-कोनापाल (बाईतवाडी) येथे दोन एकर जागेतील आंंबा-काजू बागेस मंगळवारी आग लागून एकूण सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. सावंत कुटुंबीय, नामदेव पांढरे, अमरनाथ वैज यांच्या आंबा बागेस मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीच्या भडक्याने रमाकांत सावंत, पांढरे आणि वैज कुटुंबीयांची आंबा व काजूची कलमे जळून खाक झाली.
निरवडे-कोनापाल (बाईतवाडी) येथे दोन एकर जागेतील आंंबा-काजू बागेस मंगळवारी दुपारच्या सुमारास आग लागून मोठी हानी झाली आहे. यामध्ये आंबा, काजू कलमे जळून खाक झाली.
विशेष म्हणजे यामध्ये काढणीस आलेल्या आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. तयार आंब्यांच्या १५० पेट्यांचे नुकसान झाले असून, या नुकसानीचा विचार केल्यास ढोबळमानाने केवळ दोन लाखांचे नुकसान झाले, तर जळालेल्या
आंबा कलमांचे चार लाख असे
एकूण सहा लाखांचे नुकसान झाले
आहे.
नुकसानग्रस्त शेतकरी, निरवडे तलाठी अजित वैज, प्रमोद गावडे, तळवडे सरपंच व आंबा व्यापारी पंकज पेडणेकर, आंबा व्यापारी सदा सावंत, रमण सावंत व शेतकरी जमा झाले होते. अन्य सहकारी वर्गाने ही आग आटोक्यात आणली, अन्यथा मोठे नुकसान झाले असते.
ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने अन्य ठिकाणी त्याची झळ पोहोचली नाही. अन्यथा शेजारील बागेचे मोठे नुकसान झाले असते.
दरम्यान, ही आग गावठी बॉम्ब फुटल्यामुळे लागल्याचा संशय उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. रानटी डुकरांना मारण्यासाठी गावठी बॉम्ब जंगलामध्ये ठेवले जातात. हे गावठी बॉम्ब जंगलात लावण्याचे प्रकार वाढले असून याचे लोन आता ग्रामीण भागातही पसरत आहे. त्याचाच हा परिणाम आहे.
आंबा-काजू बागेत बॉम्ब ठेवण्याचा हा उद्देश जरी वन्य प्राण्यांना हुसकावण्याचा असला तरी शिकारीसाठीही याचा उपयोग होऊ शकतो. तसेच हा घडलेला
आगीचा प्रकारही त्यामुळेच घडला असून वन विभागाने याची दखल न घेतल्याने असा प्रकार घडल्याचा आरोपही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, तळवडे गावचे सरपंच पंकज पेडणेकर यांची याठिकाणी आंबा बाग करारावर आहे. यात सावंत कुटुंबीयांची बाग त्यांनी करारावर घेतली. पण बहरात आलेल्या बागेलाच आग लागल्याने ते कमालीचे हताश झाले होते. त्यांनी या घटनेबद्दल संतापासह तीव्र नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)