नीतेश राणेंसह ५८ जणांना अटक, सुटका
By admin | Published: January 14, 2016 11:58 PM2016-01-14T23:58:07+5:302016-01-15T00:45:06+5:30
देवगडात काँग्रेसचे आंदोलन : आरोग्य यंत्रणेविरोधात मोर्चा; आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
देवगड : देवगड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या चुकीमुळे डिसेंबरमध्ये संदीप कावले या युवकाचा मृत्यू झाला होता. यावेळी काँग्रेसने आरोग्य यंत्रणेविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी काँग्रेस कार्यालय ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेल्या मनाई आदेशामुळे पोलिसांनी आंदोलनकर्ते आमदार नीतेश राणेंसह ५८ जणांना ताब्यात घेत दुपारी त्यांची सुटका करण्यात आली.
देवगडमधील संदीप कावले या रुग्णाच्या मृत्यूनंतर आमदार नीतेश राणे यांनी ९ जानेवारीला देवगडचे सुपुत्र असलेले राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या घरासमोर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्याचवेळी शिवसेनेने काँग्रेसविरोधात प्रतिआंदोलन छेडण्याचाही इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नियमन आदेश काढले होते. त्यामुळे ९ जानेवारीचे आंदोलन रद्द करण्यात आले. मात्र, हे आंदोलन १४ जानेवारीला छेडण्याचे काँग्रेसने जाहीर केले होते. प्रशासनाने पुन्हा जिल्ह्यात मनाई आदेश लावले आहेत; असे असतानाही ठरल्याप्रमाणे काँग्रेसने आंदोलन केलेच. मात्र, हे आंदोलन आरोग्यमंत्री यांच्या वळिवंडे येथील बंगल्यासमोर न करता ते ग्रामीण रुग्णालय देवगड येथे करण्यात आले. या आंदोलनामध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत, सुदन बांदिवडेकर, मिलिंद कुलकर्णी, महिला आघाडीप्रमुख प्रणिता पाताडे, तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, जनार्दन तेली, माजी सभापती मनोज सारंग, मेघा गांगण, संजय बोंबडी, योगेश चांदोस्कर, बाळ खडपे, आदी पदाधिकारी सहभागी होते.
आंदोलनानंतर आमदार नीतेश राणे यांनी देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपस्थित असलेल्या जिल्हा चिकित्सक डॉ. नितीन बिलोलीकर यांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये मृत संदीप कावले यांच्या कुटुंबीयांना नोकरीत घेण्याच्या मागणीसह व देवगड येथे अनुभवी डॉक्टर्स व विशेषत: स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ यांची उपलब्धता प्राधान्याने करावी. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदांचा प्रश्न गंभीर असून, ही पदे भरण्यासाठी गांभीर्याने पाठपुरावा करावा. जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टर्स शासकीय सेवेत येण्यासाठी ग्रामीण भागासाठी वेगळे आरोग्य धोरण असावे व अशा तज्ज्ञ डॉक्टरांसाठी विशेष सवलती व इन्सेंटिव्हज देण्यात यावीत. अशा मागण्या केल्या आहेत. कडक पोलीस बंदोबसआंदोलनासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. २० पोलीस अधिकारी व १५० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या वळिवंडे येथील बंगल्यासमोरही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवगड ग्रामीण रुग्णालय परिसरात पोलिसांमुळे छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. (प्रतिनिधी)
आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा
द्यावा : नीतेश राणे
नीतेश राणे म्हणाले की, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ढेपाळत चाललेली आहे. याकडे जिल्ह्याचे सुपुत्र असलेले आरोग्यमंत्री दुर्लक्ष करीत आहेत. रुग्णांना उपचारांअभावी प्राण गमवावे लागत आहेत. आरोग्यमंत्र्यांना आपल्या जिल्ह्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. महाराष्ट्रामध्ये सर्वांत कमी डॉक्टर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. ही एक गंभीर परिस्थिती असताना आरोग्यमंत्री कोणतीही उपाययोजना करीत नाहीत. यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना जिल्ह्यातून बाहेर जाऊ दिले जाणार नाही, असा इशारा आमदार राणे यांनी दिला.