Maharashtra Vidhan Sabha 2019 : नितेश राणे भाजपामध्ये, भरला सदस्य नोंदणीचा फॉर्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 01:15 PM2019-10-03T13:15:22+5:302019-10-03T13:23:22+5:30
नितेश राणे यांनी कमळ हाती घेत गुरुवारी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर उपस्थित होते. राणे यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता.
कणकवली : नितेश राणे यांनी कमळ हाती घेत गुरुवारी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर उपस्थित होते. राणे यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता.
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत नीतेश राणेंनी भाजपा सदस्य नोंदणीचा फॉर्म भरला. त्यांनी स्वाभिमान पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजप पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी कणकवली भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
भाजपचे युवा नेते संदेश पारकर हे भाजप-शिवसेना युती कडून कणकवली विधानसभा मतदार संघात उमेदवारी लढविणार असतानाच भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी नारायण राणे यांच्या पाठीशी उभे राहत नीतेश राणेंचा भाजपा सदस्य नोंदणीचा फॉर्म गुरुवारी दुपारी भरून घेतला.
नितेश राणे भाजपा कार्यालयाजवळ येताच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांसह भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. नीतेश राणे यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली.
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा भाजपमय करणार- नितेश राणे
स्वाभिमान पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजप पक्षाचे सदस्यत्व आज "मी" स्वीकारले आहे. उद्या कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत. लवकरच सिंधुदुर्ग जिल्हा भाजपमय होईल, तसेच एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करू,अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. स्वाभिमान पक्षातून आलेले राणेंचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत असेही त्यांनी सांगितले.