सिंधुदुर्ग तो बहाणा है, पेंग्विन को गोवा मे बॉलिवूड के ॲक्टरोंके साथ नाचना है, नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र
By सुधीर राणे | Published: November 23, 2023 11:48 AM2023-11-23T11:48:04+5:302023-11-23T11:48:42+5:30
संघटना खिळखिळी होते तेव्हा खळा बैठकांशिवाय पर्याय नाही
कणकवली : खळा बैठका आणि आदित्य ठाकरे यांचा कोकण दौरा व गोवा येथे सुरू असलेला फिल्म फेस्टिव्हल याचे काय कनेक्शन आहे ? सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आदित्य ठाकरे यांचे खरेच प्रेम आहे की, गोव्याच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावून, बॉलीवूडच्या लोकांसोबत त्यांना पार्टी करायची आहे. 'सिंधुदुर्ग तो बहाणा है, पेंग्विन को गोवा मे बॉलिवूड के ॲक्टरोंके साथ नाचना है! अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे. तसेच ज्यांची संघटना खिळखिळी झाली, त्यांना खळा बैठकांशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही ते म्हणाले.
कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी बुधवारी आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, गांधी कुटुंबीयांवर झालेल्या कारवाईचे समर्थन करणे म्हणजे भ्रष्टाचाराला समर्थन करण्यासारखे आहे. संजय राऊत ते करत आहेत. राहुल गांधी यांनी पनवती या शब्दावर मोठं वक्तव्य करण्याचे धाडस केले आहे. १९ नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी यांची जयंती होती. मग, भारत त्यादिवशी जिंकलाच पाहिजे होता. पण, खरी पनवती कोण ? गेल्या ७० वर्षात देशात गांधी कुटुंबाची जी पनवती लागलेली होती ती नरेंद्र मोदी यांनी सत्ता बदल करून दूर केली आहे.
'फादर ऑफ द नेशन' कसा असतो, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला दाखवून दिले आहे. क्रिकेटची मॅच संपल्यानंतर उपविजेत्या ठरलेल्या भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूला भेटून त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. याउलट राहुल गांधींचे असून, त्यांना देशप्रेम कधीच कळणार नाही.
ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची संपत्ती जप्त होणार
ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांची संपत्ती जप्त होणार. ज्या डॉक्टर महिलेच्या घरावर दारूच्या बाटल्या मारल्या, त्यांना त्रास दिला. छळले, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी गृह मंत्रालयाला अधिवेशनात करणार आहे. गृहमंत्री आणि त्यांचे खाते कसे आहे, ते संजय राऊत यांना लवकरच कळेल, असेही आमदार राणे म्हणाले.