रुग्णालयाची नीतेश राणेंकडून बदनामी : वैभव नाईक यांनी केली टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 05:18 PM2020-09-28T17:18:11+5:302020-09-28T17:20:17+5:30
ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाची आमदार नीतेश राणे व त्यांचे भाजपमधील सहकारी सातत्याने बदनामी करीत आहेत. परंतु अनेक रुग्ण जिल्हा रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता जिल्ह्यातील शासकीय डॉक्टर, अधिकारी, परिचारिका, कर्मचारी रुग्णांना सेवा देत आहेत. मात्र, राजकीय फायद्यासाठी या सर्वांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण नीतेश राणे मुंबईत बसून करत आहेत, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
कणकवली : ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाची आमदार नीतेश राणे व त्यांचे भाजपमधील सहकारी सातत्याने बदनामी करीत आहेत. परंतु अनेक रुग्ण जिल्हा रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता जिल्ह्यातील शासकीय डॉक्टर, अधिकारी, परिचारिका, कर्मचारी रुग्णांना सेवा देत आहेत. मात्र, राजकीय फायद्यासाठी या सर्वांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण नीतेश राणे मुंबईत बसून करत आहेत, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
जिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन सामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक व मी सुद्धा कोरोनामुक्त झालो आहे. राणेंचे अनेक पदाधिकारी, त्यांच्या संस्थेचे कर्मचारी यांनीसुद्धा याच रुग्णालयात उपचार घेतले.
पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकुरकर हे जिल्ह्यात वेगवेगळ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत आहेत. जिल्हा रुग्णालयातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, उशिराने कोविडसाठी बेड दिलेल्या आपल्या खासगी रुग्णालयाचा व्यवसाय वाढविण्यासाठी व राजकीय फायद्यासाठी राणे व त्यांचे भाजपचे सहकारी शासकीय आरोग्य व्यवस्थेची बदनामी करीत आहेत काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात मोफत रुग्णसेवा दिली. त्यामुळे नाईलाजाने राणेंना आपल्या रुग्णालयातील काही बेड कोविडसाठी द्यावे लागले. त्यांनी आपल्या रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू केले असते तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना मिळाला असता. मात्र, त्यांच्या रुग्णालयात किती रुग्ण उपचार घेत आहेत? किती बरे झाले? हे राणेंनी जाहीर करावे.