कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १२ कर्मचारी सेवा देणार, नितेश राणेंनी दिली माहिती
By सुधीर राणे | Published: July 10, 2023 04:18 PM2023-07-10T16:18:31+5:302023-07-10T16:18:58+5:30
कणकवली : माझ्या आमदारकीच्या ९ वर्षाच्या कालावधीत कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. त्यावेळी मी विरोधी पक्षात ...
कणकवली: माझ्या आमदारकीच्या ९ वर्षाच्या कालावधीत कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. त्यावेळी मी विरोधी पक्षात असल्याने सरकारकडे मागणी करुनही डॉक्टर आणि रिक्त पदे भरली नाहीत. आता सरकार आमचे आहे. रिक्त पदे भरण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. तोपर्यंत वैद्यकीय सेवा देणाऱ्या एका संस्थेच्या माध्यमातून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १२ कर्मचारी मंगळवार पासून सेवा देणार आहेत अशी माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली. तसेच रुग्णांना सेवा देताना आता कोणतीही कारणे चालणार नाहीत असा इशारा वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांना दिला. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राणे म्हणाले, कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत आढावा घेतला होता. रुग्णांना सेवा का मिळत नाही?उपचारासाठी आलेल्या रुग्णांना ओरस किंवा अन्य ठिकाणी पाठवले जाते. याबाबत विचारले असता येथील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्ग ४ ची रिक्त पदे आणि लिपिक वर्ग कर्मचाऱ्यांची गरज येथे असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सरकारकडून रिक्त पदांची भरती होईपर्यंत एका खासगी संस्थेशी आपण संपर्क केला. त्या संस्थेमार्फत ४ कनिष्ठ लिपिक आणि ८ चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशा १२ जणांची नेमणूक करण्यात आली आहे. ते मंगळवार पासून सेवा देतील. जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने हा निर्णय शासकीय प्रक्रियेच्या बाहेर जाऊन घेण्यात आला असल्याचे राणेंनी सांगितले.
नेमणूक करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार संबंधित संस्थाच देणार आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा केली आहे. आम्ही सगळी मदत करीत आहोत. मात्र, डॉ.धर्माधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन आता काम केले पाहिजे. यापुढे तक्रारी चालणार नाहीत. लवकरच कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील असेही ते म्हणाले.
यावेळी पत्रकार परिषदेस डॉ.नागनाथ धर्माधिकारी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे , कलमठ सरपंच संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.