समय बलवान हे.., न्यायालयात शरण जाण्यापूर्वी नितेश राणेंची फेसबुकवर पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 16:27 IST2022-02-02T16:08:50+5:302022-02-02T16:27:31+5:30
आपल्या फेसबुक अकाउंटवर त्यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा व पी. चिदंबरम यांचा फोटो पोस्ट केला आहे

समय बलवान हे.., न्यायालयात शरण जाण्यापूर्वी नितेश राणेंची फेसबुकवर पोस्ट
सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी असलेले भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे. यातच आज नितेश राणे यांनी आपला जामीन अर्ज मागे घेवून पोलिसांच्या चौकशीला शरण जाणार असल्याची माहिती दिली आहे. तर आपल्या फेसबुक अकाउंटवर त्यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा व पी. चिदंबरम यांचा फोटो पोस्ट केला आहे.
पोस्टमध्ये गृहमंत्री अमित शहा व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या फोटोखाली त्यांनी 'समय बलवान हे इन्सान खामो खा गुरूर करता हे' असे कॅप्शन देखील दिले आहे. शहा व चिदंबरम यांना पोलिसांनी अटक केलेला हा फोटो आहे. याच प्रमाणे आपल्यावरही अटकेची कारवाई होत असल्याने भविष्यात आपण याची परतफेड करू असेच यातून ते दर्शवत आहेत.
गृहमंत्री अमित शहा यांना गुजरात दंगली प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावेळी युपीए मध्ये केंद्रिय गृहमंत्री पी. चिदंबरम होते पण नंतर केंद्रिय गृहमंत्री अमित शहा असताना चिदंबरम यांना ही एका गुन्हयात सीबीआय कडून अटक करण्यात आली होती. त्यामुळे भविष्यात आपण याची परतफेड करु असा इशाराच त्यांनी यातून दिला असल्याची चर्चा रंगली आहे.
आमदार नितेश राणे यांच्या अटकेवरुन सिंधुदुर्गन्यायालयाबाहेर त्यांची गाडी अडवल्यामुळे पोलीस आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी निलेश राणे यांनी आक्रमक बनत पोलिसांशी हुज्जत घातली. याप्रकरणी ओरोस पोलिसांनी काल, मंगळवारी निलेश यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे भविष्यात पोलीस-राणे कुटुंबीयातील संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.