नीतेश राणे यांनी स्टंटबाजी करू नये
By admin | Published: January 18, 2015 11:24 PM2015-01-18T23:24:46+5:302015-01-19T00:22:15+5:30
वैभव नाईक : भात खरेदी दोन दिवसांत सुरू होणार
कणकवली : युतीमधील नेते धान्य खरेदी संदर्भात प्रयत्न करत होते. शासनाने भात खरेदीसाठी हिरवा कंदील दाखवला असून येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकारी भातखरेदीचे आदेश काढणार आहेत. त्यामुळे आमदार नीतेश राणे यांनी आंदोलनाची स्टंटबाजी करू नये, असे आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे. ते कणकवली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होते.नाईक पुढे म्हणाले, राज्य मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेल्या गोदामातील भाताची शासनाने उचल केलेली नव्हती. नागपूर अधिवेशनापासून मी स्वत: आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करत होतो. केंद्रीय खाद्यमंत्री रामविलास पासवान यांच्याकडेही यासंदर्भात बैठक घेऊन मंत्री बापट यांनी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी थांबलेल्या भातखरेदीसंदर्भात प्रयत्न चालवले होते.
जिल्ह्यातील गोदामांची साठवण क्षमता कमी आहे. ज्यांच्या ताब्यात खरेदीविक्री संघ आहेत तेच गोदामे सुरक्षित नसल्याचे सांगत आहेत. कॉँग्रेसच्या सत्ताकाळात गोदामे उभारण्यासाठीही निधी आणण्यात आला नाही. त्यामुळे आमदार राणेंनी दिखावू आंदोलने करू नयेत, असे नाईक म्हणाले.गेल्या नियोजन बैठकीत हत्ती हटावसाठी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच केंद्र सरकारकडून यापूर्वीच ३० लाखाच्या निधीची तरतूद झाली आहे. परराज्यातील पाळीव हत्ती आणण्यासाठी दोन-तीन दिवसांत परवानगी मिळेल. जिल्ह्यातील कॉँग्रेस नेत्यांनी इकोसेन्सिटिव्ह संदर्भात केलेली आंदोलने दिखावू ठरली. युती सरकार आल्यानंतर याप्रश्नी विशेष अॅटर्नी जनरल देऊन प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. भविष्यात हा प्रश्न उदभवणार नाही, असे आ. वैभव नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अद्याप प्रश्न सुटला नाही; बुधवारी मंत्र्यांची बैठक
नीतेश राणेंनी कोल्हापूर बसस्थानकांसंदर्भातील एसटीचा प्रश्न सोडवल्याचे फुकाचे श्रेय घेतले. मात्र, अद्यापही हा प्रश्न सुटलेला नाही. बुधवारी यासंदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सर्वप्रकारचे कर भरत असल्याने एसटी बसला कुठल्याही स्थानकात जाण्याचा अधिकार असल्याची शिवसेनेची भूमिका आहे, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
आंगणेवाडीतील रस्त्यासाठी निधी मंजूर
मुंबई-आंगणेवाडी अशा दोन थेट विशेष व्होल्व्हो गाड्या सोडण्याची मागणीही रावते यांच्याकडे करणार आहे. परेल- मालवण व्हाया आंगणेवाडी अशा या बस सोडण्यात येतील. आंगणेवाडी बसस्थानक ते मंदिरापर्यंतच्या रस्त्यासाठी ४० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.