नितेश राणेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा आरक्षणाबाबत बोलू नये - सतीश सावंत 

By सुधीर राणे | Published: December 15, 2023 12:27 PM2023-12-15T12:27:19+5:302023-12-15T12:27:58+5:30

'सोन्याचा चमचा तोंडात घेवून जन्माला आलेल्या नितेश राणे यांना गरिबीचे चटके बसलेले नाहीत'

Nitesh Rane should not talk about Maratha reservation for his own selfishness says Satish Sawant | नितेश राणेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा आरक्षणाबाबत बोलू नये - सतीश सावंत 

नितेश राणेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा आरक्षणाबाबत बोलू नये - सतीश सावंत 

कणकवली: सोन्याचा चमचा तोंडात घेवून जन्माला आलेल्या नितेश राणे यांना गरिबीचे चटके बसलेले नाहीत. त्यामुळे त्यांना कुणबी आरक्षणाची किंमत कळणार नाही. मराठा समाज नेते मनोज जरांगे - पाटील यांनी समाजाला शैक्षणिक, नोकरी आणि राजकीय असे कुणबी म्हणून सरसकट आरक्षण मिळावे, ही भूमिका घेवून १७ दिवस उपोषण केले होते. नितेश राणेंनी मराठा समाजासाठी निदान १७ तास तरी उपोषण करावे.फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत बोलू नये असा सल्ला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला आहे.

तसेच आता राजकीय आरक्षण मिळाले आणि  कणकवली विधानसभा मतदारसंघ कुणबी मराठा यांच्यासाठी राखीव झाल्यास नितेश राणे हे त्याचा फायदा घेण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी पहिले जातील. काँग्रेसमध्ये असताना जे नितेश राणे फडणवीसांचे सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार नाही असे म्हणत होते.ते आता  स्वतःच्या स्वार्थासाठी आपली भूमिका बदलत आहेत. मराठा आणि कुणबी मराठा यांच्यात स्वतःच्या स्वार्थासाठी नितेश राणेंनी भेद करु नये. कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजेश रावराणे, सिध्देश रावराणे उपस्थित होते. 

सावंत म्हणाले, मराठा समाजातील गरिबीचे चटके बसणाऱ्या लोकांना आरक्षण हवे आहे.ज्या मुलांना आरक्षणामुळे उच्च शिक्षण घेताना शैक्षणिक प्रवेश मिळत नाहीत .त्या मुलांसाठी शैक्षणिक आरक्षण महत्त्वाचे आहे.त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघ जर कुणबी मराठा समाजासाठी  आरक्षित झाला तर नितेश राणे काय करणार ? हे त्यांनी जाहीर करावे. 

मनोज जरांगे- पाटील यांच्या भूमिकेला मोठा पाठिंबा मिळत आहे.त्यांच्या सभांना लाभणारा प्रतिसाद मोठा आहे.त्यामुळे राणे यानी त्यांच्यासारखीच जाहीर सभा घ्यावी,त्यात मराठा आणि कुणबी मराठा आरक्षणावर भूमिका मांडावी, म्हणजे त्यांना समाजाचा प्रतिसाद समजेल.

जरांगे पाटील यांची लवकरच जिल्ह्यात सभा !

मनोज जरांगे पाटील यांची सिंधुदुर्गात सभा होण्यासाठी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत आणि सिताराम गावडे हे प्रयत्न करत आहेत.असे सतीश सावंत यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Nitesh Rane should not talk about Maratha reservation for his own selfishness says Satish Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.