तेलंगणात दौरे करणाऱ्या नितेश राणेंनी आधी मतदारसंघातील आरोग्य समस्यांकडे लक्ष द्यावे, सुशांत नाईकांचा टोला

By सुधीर राणे | Published: December 1, 2023 04:00 PM2023-12-01T16:00:30+5:302023-12-01T16:01:07+5:30

स्वतःचे खासगी हॉस्पिटल चालावे म्हणून आरोग्य यंत्रणेकडे दुर्लक्ष

Nitesh Rane, who is touring Telangana, should first look at the health issues in the constituency says Sushant Naik | तेलंगणात दौरे करणाऱ्या नितेश राणेंनी आधी मतदारसंघातील आरोग्य समस्यांकडे लक्ष द्यावे, सुशांत नाईकांचा टोला

तेलंगणात दौरे करणाऱ्या नितेश राणेंनी आधी मतदारसंघातील आरोग्य समस्यांकडे लक्ष द्यावे, सुशांत नाईकांचा टोला

कणकवली: निवडणूक प्रचारासाठी तेलंगणात दौरे करणाऱ्या आमदार नितेश राणेंनी कर्तव्याची जाणीव ठेवून आधी आपल्या मतदारसंघातील जनतेच्या आरोग्य समस्यांकडे लक्ष द्यावे, असा टोला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लगावला. कणकवली येथील विजय भवन येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

नाकर्त्या स्थानिक आमदार नितेश राणेंमुळे कणकवली विधानसभा क्षेत्रात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. यामुळे कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील गोरगरीब जनतेला दिलासा मिळावा म्हणून युवासेनेने मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आहे. पडवेमधील स्वतःचे खासगी हॉस्पिटल चालावे म्हणून राणे आरोग्य यंत्रणेकडे दुर्लक्ष करत असल्याची टीकाही नाईक यांनी केली.

युवासेनेच्यावतीने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू चिकित्सा शिबिर कणकवली विधानसभा क्षेत्रातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहेत. जनतेच्याप्रति असलेले आपले कर्तव्य लक्षात घेऊन युवा सेना काम करीत आहे. केवळ विरोधक म्हणून ढासळलेल्या आरोग्य यंत्रणेवर आवाज उठवून फक्त युवासेना स्वस्थ बसणार नाही. जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करू असेही ते यावेळी म्हणाले.

शिबिरात आढळलेल्या सर्व मोतीबिंदू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया ओरोस येथील  शासकीय रुग्णालयात करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांचा प्रवास आणि जेवण खर्च युवा सेना करणार आहे. हे शिबिर सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ६ डिसेंबरला शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, १० डिसेंबरला कलमठ, १६ डिसेंबरला रोजी वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, २१ डिसेंबर रोजी कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्र, २३ डिसेंबरला रोजी पडेल प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार असून याचा लाभ जनतेने घ्यावा. आरोग्य शिबिरात सहभागी रुग्णांचा बीपी, मधुमेह आदी तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.

पत्रकार परिषदेस युवासेना उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत, युवासेना देवगड तालुकाप्रमुख फरीद काझी, वैभववाडी तालुकाप्रमुख रोहित पावसकर, कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, कलमठ शहरप्रमुख धीरज मेस्त्री, नितेश भोगले, दत्तप्रसाद धुरी, संतोष ठुकरुल आदी उपस्थित होते. 

Web Title: Nitesh Rane, who is touring Telangana, should first look at the health issues in the constituency says Sushant Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.