सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या नितेश राणेंना माझ्या निष्ठेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही - वैभव नाईक
By सुधीर राणे | Published: February 17, 2024 03:27 PM2024-02-17T15:27:25+5:302024-02-17T15:28:14+5:30
शिवसेनेत एकनिष्ठेने काम करतो त्यांचा नितेश राणेंना पोटसुळ; मी कोणालाही भेटताना चोरुन भेटत नाही
कणकवली: मी गेली १५ वर्ष शिवसेना पक्षासोबत काम करतो. त्याचाच नितेश राणेंना पोटसुळ उठत आहे. मी कोणालाही भेटताना चोरुन भेटत नाही. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नियोजित दौ-यामध्ये कणकवली शासकीय विश्रामगृहावर मी त्यांना विकासकामांसदर्भात अधिका-यांसमोरच भेटलो. माझ्या निष्ठेवर नितेश राणेंना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. ते गेल्या १५ वर्षात सत्तेसाठी अनेक पक्ष बदलत राहिले असल्याची टिका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. कणकवली येथील विजयभवन येथे आमदार वैभव नाईक यांनी शनिवारी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळी कुठलीही सत्ता शिवसेनेबरोबर नव्हती. त्यानंतर दोन वेळा मी आमदार झालो आहे. लोकांनी माझ्या निष्ठेवर विश्वास ठेवल्यामुळेच मी आमदार झालो आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. येणा-या काळामध्ये सुध्दा उध्दव ठाकरेंसोबतच मी राहणार आहे. हे मला वारंवार नितेश राणेंसारखे सांगण्याची काही गरज नाही. कारण नितेश राणे हे प्रत्येक निवडणूकीमध्ये पक्ष बदलत असतात. त्यांनी स्वत: पहिली निवडणूक कॉग्रेसच्या चिन्हावर लढवली. दुसरी विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपाच्या चिन्हावर लढवली. त्यामुळे सत्ता जिथे असेल तिथे हे राणे कुटुंबिय असतात, अशी टिका आमदार वैभव नाईक यांनी केली.
सत्ता आणि राणेंचे जवळचे नाते आहे. त्यामुळे राणेंचा निष्ठेशी कुठलाही दुरान्वये संबंध नाही. त्यामुळे नितेश राणेंनी आमच्या निष्ठेवर बोलण्यापेक्षा १५ वर्षांत आपण किती पक्ष बदलले ? ज्या ज्या पक्षाची सत्ता होती त्या त्या पक्षांमध्ये ते गेले. त्यामध्ये शिवसेना , कॉग्रेस,भाजप या पक्षांचा समावेश आहे. त्या सगळ्या सत्तेचा वापर करुन आज पुन्हा ते सत्तेसाठीच प्रयत्नरत आहेत.असा टोलाही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी लगावला.