नीतेश राणेंनी वायफळ बडबड थांबवावी
By admin | Published: October 26, 2015 11:22 PM2015-10-26T23:22:08+5:302015-10-27T00:16:02+5:30
विनायक राऊत : वैभववाडीच्या रचनात्मक विकासाची जबाबदारी युतीची
वैभववाडी : विकास कसा बघायचा हे आमदार नीतेश राणे यांना कळत नाही. त्यामुळे त्यांनी वायफळ बडबड थांबवावी आणि आम्ही काय करतो ते शांतपणे पाहत बसावे, असा टोला लगावत लोकसभेपासून सुरु झालेले राजकीय परिवर्तन जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत असेच सुरु राहणार असून वैभववाडीच्या रचनात्मक विकासाची जबाबदारी शिवसेना भाजप युतीने घेतली आहे, अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी खासदार राऊत वैभववाडीत आले असता त्यांनी जयेंद्र रावराणे यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुभाष मयेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, उपजिल्हा प्रमुख राजू शेटये, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, तालुकाप्रमुख अशोक रावराणे, कणकवलीचे नगरसेवक सुशांत नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख अॅड. हर्षद गावडे, राजेंद्र राणे, नंदू शिंदे, मंगेश लोके, श्रीराम शिंगरे, रोहन रावराणे आदी उपस्थित होते.
राऊत पुढे म्हणाले, माजी पालकमंत्री नारायण राणे व त्यांच्या पिलावळीचा खादाडपणा आणि लुबाडण्याच्या धोरणामुळे सिंधुदुर्गची पिछेहाट झाली होती. राणेंच्या जाचातून सुटका झाल्यानंतर आता युती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याची परिस्थिती सुधारत आहे. वैभववाडीच्या विकास आराखड्याची मालवणसारखी स्थिती आम्हाला होऊ द्यायची नाही. बिल्डर, हॉटेल व्यावसायिक स्वत:च्या मालमत्ता वाचविण्यासाठी मालवण नगर परिषदेतील सत्ताधा-यांनी स्थानिकांच्या राहत्या घरांवर आरक्षणे टाकण्याचे पाप केले आहे. ते इथे होऊ द्यायचे नाही; म्हणून येथील मतदारांनी निर्भयपणे युतीच्या उमेदवारांना मतदान करावे. राऊत म्हणाले की, वैभववाडी हे कोल्हापूर आणि सिंधुदुर्गचे मध्यवर्ती ठिकाण आहे. वैभववाडी कोल्हापूर रेल्वेमार्गामुळे वैभववाडीचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. त्यामुळे वैभववाडीचा विकास आराखडा तज्ञांची मते आणि स्थानिकांना विश्वासात घेऊनच रचनात्मक पद्धतीने तयार केला जाईल. केंद्राच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत १0२ कोटींचे पॅकेज मंजूर झाले आहे. या योजनेमुळे सागरी आणि डोंगरी भागातील पर्यटनाला चालना मिळणार त्यामध्ये गगनगडापासून आंबोलीपर्यंतच्या गावांचा पर्यटन विकास केला जाणार आहे. कणकवली नगरपंचायतीत सुरु असलेली दहशत गुंडगिरी झुगारून माजी नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत यांनी वेगळा पर्याय उभारुन कणकवलीकरांची निर्भत्सनेतून सुटका केली. त्याबद्दल अॅड. खोत यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कणकवलीतील बदलामुळे राणे पितापुत्रांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. वैभववाडीतील जनताही विकासासाठी आमच्यासोबत राहिल , असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
पारकरांच्या प्रवेशाचे निमंत्रण आजच देतो : राऊत
संदेश पारकर यांच्या शिवसेना प्रवेशाला स्थानिक पदाधिका-यांचा विरोध आहे. त्यामुळे मातोश्रीवर पारकरांचा प्रवेश घेऊन दाखवा असे आव्हान आमदार नीतेश राणे यांनी दिले आहे. याबाबत विचारले असता, आम्ही कोणावरही दबाव टाकून पक्षप्रवेश घेत नाही. पारकरांच्या शिवसेना प्रवेशाचे निमंत्रण आपण आजच नीतेश राणेंना देत आहे, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.