नीतेश राणे यांची आमदारकी रद्द करा
By Admin | Published: January 19, 2017 11:14 PM2017-01-19T23:14:36+5:302017-01-19T23:14:36+5:30
मेधा कुलकर्णी : अटकही करण्याची मागणी
पुणे : गडकरींचा पुतळा तोडणाऱ्या संभाजी ब्रिगेडकडून गुंडगिरी करून समाजाचे स्वास्थ्य बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच असे चुकीचे कृत्य करणाऱ्यांना आमदार नीतेश राणेंकडून पाठिंबा मिळत असेल तर त्यांचे आमदारपद रद्द करावे तसेच त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.
कोथरुड नाट्य परिषद व रमाबाई आंबेडकर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जानेवारी रोजी नाटककार राम गणेश गडकरी यांच्या ९७ व्या स्मृतिदिनानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी कोथरुड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन उपस्थित होते. यामध्ये गडकरी यांच्या नाटकांतील प्रवेशांचे वाचन केले जाणार असून, हा कार्यक्रम होऊ नये, यासाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यात येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनही गुंडगिरीला घाबरते का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
कुलकर्णी म्हणाल्या, समाजातील कोणत्याही गटाकडून अशापद्धतीने गुंडगिरी करून स्वातंत्र्यावर गदा आणली जात असेल तर हे धोकादायक आहे. पुण्यातिथीच्या निमित्ताने घेण्यात येत असलेला कार्यक्रम राजकीय नसून सांस्कृतिक आहे. संस्थेतर्फे मागील अनेक वर्षांपासून अनेक दिग्गजांचे कार्यक्रम करण्यात येतात, मात्र आता अचानक अशा गोष्टींना विनाकारण महत्त्व देऊन राजकारण केले जात आहे. महापालिकेने ही परवानगी नाकारल्यास प्रसंगी रस्त्यावर कार्यक्रम घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.
तैलचित्राबाबत म्हणणे सादर करा : न्यायालयाचे आदेश
संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटविल्यानंतर या ठिकाणी गडकरींचे तैलचित्र लावण्यात आले, हे कृत्य जाणीवपूर्वक आणि समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने केल्याचा आरोप अॅड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात केला. न्यायालयाने याबाबत महापालिका प्रशासन आणि डेक्कन पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पुतळा हटविल्याच्या गुन्'ाच्या तपासात राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याने पोलिसांवर दबाव येत आहे, याची न्यायालयाने दखल घ्यावी, असा अर्ज आरोपींच्या वतीने अॅड. पवार यांनी न्यायालयात केलेला आहे. त्याची सुनावणी झाली. पवार यांच्या अर्जावर सरकार पक्षाने त्यांचे म्हणणे मांडावे असा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवे-पाटील यांनी दिला आहे. या अर्जावर सरकार पक्ष, मनपा आयुक्त कार्यालय व डेक्कन पोलिसांकडून माहिती घेऊन २३ जानेवारी रोजी म्हणणे मांडणार आहे.
(प्रतिनिधी)