"कोकणात विनाशकारी प्रकल्प येऊ देणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 05:17 AM2019-03-06T05:17:38+5:302019-03-06T05:17:57+5:30

महामार्ग रुंदीकरण, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, पर्यटन, हवाई सेवा या माध्यमातून कोकणाचा विकास होत आहे.

"No destructive project in Konkan" | "कोकणात विनाशकारी प्रकल्प येऊ देणार नाही"

"कोकणात विनाशकारी प्रकल्प येऊ देणार नाही"

googlenewsNext

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : महामार्ग रुंदीकरण, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, पर्यटन, हवाई सेवा या माध्यमातून कोकणाचा विकास होत आहे. त्यामुळे यापुढे कोकणात कोणताही विनाशकारी प्रकल्प येवू दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. मात्र, रद्द झालेला नाणार रिफायनरी प्रकल्प रोह्यात होणार की नाही, यावर भाष्य टाळले.
चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पाच्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महादेव जानकर, खासदार नारायण राणे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, चिपीच्या परवानग्या मिळविण्यासाठी अनेक अडचणी होत्या. पण, सुरेश प्रभू यांनी विशेष परिश्रम घेऊन या विमानतळाच्या परवानग्यांचा मार्ग सुकर केला. हे विमानतळ हा पर्यायी विमानतळ म्हणूनही उत्तमप्रकारे काम करु शकेल.
>जठारांचा राजीनामा फाडला
नाणार प्रकल्प रद्द केल्याने संतप्त झालेले भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आपल्या पदाचा राजीनामा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सोपवला; मात्र मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न करता राजीनामा फाडून टाकला आणि फाडलेल्या कागदाचे तुकडे माजी आमदार राजन तेलींच्या हाती सोपविले. त्यामुळे जठार राजीनामा नाट्य औटघटकेचे ठरले आहे.
>राणेंचे स्वप्न केसरकर पूर्ण करत आहेत
चिपी विमानतळ व्हावा हे नारायण राणेंचे स्वप्न असून ते पूर्ण करण्याचे काम दीपक केसरकर हे करीत आहेत आणि माझा त्यांना पाठिंबा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच एकच हशां पिकला.
>कोकणीपण हरवू
देऊ नका : राणे
नारायण राणे म्हणाले, आता येथून लवकरच विमानसेवा सुरू करावी. नाणार रद्द केला, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. कोकणात क्रांती करा, पण कोकणीपण हरवू देऊ नका.

Web Title: "No destructive project in Konkan"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.