Konkan Politics : शिवसेनेकडून अपेक्षाच उरल्या नाहीत : निलेश राणेंची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:09 PM2021-05-26T16:09:57+5:302021-05-26T16:13:15+5:30
Konkan Politics : शिवसेनेने कोकणाला मतांच्या बदल्यात काय दिले? आठ दिवसांनंतरही वादळग्रस्तांना मदत नाही. वैभव नाईक यांना प्रशासनात काडीची किंमत नाही. शिवसेनेकडून जनतेला अपेक्षाच नाहीत. त्यामुळे शक्य तेवढी मदत नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचे काम भाजप करीत आहे. भाजप म्हणून आम्ही जनतेसोबत आहोत, असा विश्वास भाजप नेते, प्रदेश सचिव निलेश राणे यांनी व्यक्त केला.
मालवण : शिवसेनेने कोकणाला मतांच्या बदल्यात काय दिले? आठ दिवसांनंतरही वादळग्रस्तांना मदत नाही. वैभव नाईक यांना प्रशासनात काडीची किंमत नाही. शिवसेनेकडून जनतेला अपेक्षाच नाहीत. त्यामुळे शक्य तेवढी मदत नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचे काम भाजप करीत आहे. भाजप म्हणून आम्ही जनतेसोबत आहोत, असा विश्वास भाजप नेते, प्रदेश सचिव निलेश राणे यांनी व्यक्त केला.
तौक्ते चक्रीवादळानंतर नुकसान झालेल्या मालवण, देवबाग, वायरी व अन्य परिसराची भाजप नेते निलेश राणे यांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना पत्रे, ताडपत्री व जीवनावश्यक वस्तू, आदी मदतीचे थेट वाटप केले. नुकसानग्रस्तांना कौलांचेही वितरण केले जाईल. आम्ही आपद्ग्रस्तांसोबत आहोत, असा विश्वासही राणे यांनी दिला.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, विक्रांत नाईक, भाई मांजरेकर, जॅक्सन फर्नांडिस, अवी सामंत, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
वीजपुरवठा सुरळीत होण्यामागे स्थानिक जनतेलाच श्रेय जाते. सत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. प्रशासनावर अंकुश नसल्याने मालवण अजूनही अंधारात आहे. मात्र, आम्ही सतत प्रशासनाच्या संपर्कात आहोत.
वीज साहित्याची असलेली कमतरता दूर केली जाणार आहे. भाजप जनतेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
पत्रे विकणे आमदारांचा धंदा !, मंत्री नुसती आश्वासने देत आहेत
वादळ, भूकंप झाला की आमदार वैभव नाईक यांचा सिझन चालू होतो. त्यांचा पत्र्याचा धंदा आहे. लाज वाटली पाहिजे शिवसेनेच्या आमदाराला. या आपत्ती काळात पत्रे विकणे सुरू आहे. ज्यावेळी जनतेला मदत पाहिजे, तेव्हा हे व यांचे मंत्री नुसती आश्वासने देत आहेत. मुख्यमंत्री येऊनही जनतेला मदत जाहीर होत नाही ही शोकांतिका आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली. मुख्यमंत्री यांच्याशी बोललेल्या क्लिप व्हायरल केल्यानंतर एसडीआरएफचा निधी आला का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.