१० वर्षांत संशोधन नाही; पगारावर मात्र ५ कोटी खर्च!; दापोली कृषी विद्यापिठाची आंबा उत्पादनाबाबत अनास्था

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 07:18 PM2024-11-28T19:18:24+5:302024-11-28T19:18:59+5:30

सरकारने लक्ष घालण्याची शेतकऱ्यांची मागणी

No new research has been done in the last 10 years at the Mango Production Research Sub-Centre at Rameshwar | १० वर्षांत संशोधन नाही; पगारावर मात्र ५ कोटी खर्च!; दापोली कृषी विद्यापिठाची आंबा उत्पादनाबाबत अनास्था

१० वर्षांत संशोधन नाही; पगारावर मात्र ५ कोटी खर्च!; दापोली कृषी विद्यापिठाची आंबा उत्पादनाबाबत अनास्था

देवगड : रामेश्वर येथील आंबा उत्पादन संशोधन उपकेंद्र स्थापन झाले, मात्र गेल्या १० वर्षांत आंबा उत्पादनासाठी कोणतेही नवीन संशोधन झालेले नाही. मात्र, या कालावधीत निव्वळ पगारासाठी ५ कोटींहून अधिक रक्कम खर्च झाल्याने हे संशोधन केंद्र आता पांढरा हत्ती ठरला आहे.

दरवर्षी आंब्यावरील विविध रोग आणि कीड यांमुळे उत्पादन दिवसेंदिवस कमी होऊन आंबा उत्पादकांना फटका बसत आहे. अशा वेळी दापोली येथील ‘डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यपीठा’च्या अंतर्गत कार्य करणाऱ्या या संशोधन केंद्राने आंबा उत्पादनाविषयीची अनास्था झाली आहे, तसेच आंबा उत्पादकांसाठी प्रभावी कृती कार्यक्रम राबवणे, तसेच उपयुक्त संशोधन करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आता राज्य सरकारने यात गंभीरपणे लक्ष घालावे, अशी मागणी आंबा उत्पादक आणि हिंदू जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’ने पत्रकार परिषदेतून केली.

देवगड येथील हॉटेल वेदा येथे झालेल्या पत्रकार परिषदेला ‘आंबा व्यापारी संघटने’चे अध्यक्ष विलास रूमडे, तसेच आंबा उत्पादक सर्वश्री विकास दीक्षित, दत्तात्रय जोशी, बापर्डे सरपंच संजय लाड, सनातन संस्थेचे सद्गुरू सत्यवान कदम, हिंदू विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदू जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे डॉ. रविकांत नारकर आणि हिंदू जनजागृती समितीचे राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

दरवर्षी आंब्यावरील विविध रोग आणि कीड यांमुळे उत्पादन कमी होणे, गुणवत्ता खालावणे, तसेच खर्चात वाढ होणे यांसारख्या समस्या आंबा उत्पादकांना भेडसावत आहेत. त्यातच रासायनिक औषधांबाबत उत्पादकांमध्ये मोठा गोंधळ असून, कंपन्यांकडून योग्य माहिती मिळत नसल्याने उत्पादकांना आर्थिक तोटा होत आहे. मात्र, रामेश्वर येथील आंबा संशोधन उपकेंद्राकडून यासंदर्भात कोणतेही दिशादर्शन मिळत नाही, असे दिसून येते. उत्पादकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी या आंबा संशोधन केंद्रातून ‘ड्रॅगन फ्रूट’ची शेती केली जात आहे, हा काय प्रकार आहे? असा प्रश्नही यावेळी विचारण्यात आला.

माहिती उत्पादकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे

या संशोधन केंद्रामध्ये आंब्याच्या विविध जातींवर आधारित प्रत्यक्ष संशोधन करणे, तसेच तिथे उत्पादकांसाठी लागवड, तंत्रज्ञान, रोगनिवारण आणि विपणन यावर आधारित प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वत्र केला जातो, तर संशोधनातून मिळणारी माहिती व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आदी सामाजिक माध्यमांद्वारे, संकेतस्थळे यांद्वारे उत्पादकांपर्यंत पोहोचवणे वा त्यांच्याशी संवाद साधण्याचे काम संशोधन केंद्राने केले पाहिजे.

आंदोलनाचा इशारा

यासोबतच संशोधन केंद्रामध्ये आंबा उत्पादनाशी संबंधित डिप्लोमा कोर्स सुरू करणे, ज्यामुळे पुढच्या पिढ्यांना तंत्रज्ञान आणि व्यवसायिवषयक कौशल्य मिळेल, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. आंबा उत्पादकांना या संदर्भात काही समस्या असतील, तर त्यांनी ‘सुराज्य अभियाना’चे डॉ. रविकांत नारकर यांना संपर्क साधावा. तसेच आंबा उत्पादकांच्या वरील मागण्यांची दखल घेऊन राज्य सरकारने तत्काळ सुधारणा करावी, अन्यथा आंबा उत्पादकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Web Title: No new research has been done in the last 10 years at the Mango Production Research Sub-Centre at Rameshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.