कोणाचीही धाकदपटशा खपवून घेणार नाही
By admin | Published: October 18, 2015 12:07 AM2015-10-18T00:07:53+5:302015-10-18T00:22:27+5:30
नगरपंचायत निवडणूक : वैभववाडीतील व्यापारी, राजकीय पक्षांचा एल्गार
वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी परजिल्ह्यातून आलेल्या अनोळखी व्यक्तींकडून व्यापारी व नागरिकांना धमकावले जात आहे. परंतु वैभववाडी शहर शांतताप्रिय आहे. त्यामुळे कोणाचीही धाकदपटशा खपवून घेतली जाणार नाही, असा एल्गार व्यापारी व राजकीय पक्षांनी पत्रकार परिषदेत दिला.
सज्जनराव रावराणे यांना धमकावल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांसह वैभववाडीतील व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस अधिकाऱ्यांशी त्या घटनेबाबत चर्चा केली. त्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर सर्वपक्षीय पत्रकार परिषद झाली.
यावेळी वैभववाडी शहर शांतताप्रिय आहे. परंतु, नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेरून आलेल्या अनोळखी व्यक्तींकडून व्यापारी व नागरिकांना धमकावले जात आहे. त्यामुळे शहरात सध्या प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक प्रत्येक पक्षाने लढवावी. परंतु येथील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कुठल्याच पक्षाने करू नये. आम्ही वैभववाडीची कणकवली किंवा वेंगुर्ले कदापि होवू देणार नाही. आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशारा सर्वपक्षीयांनी दिला. (प्रतिनिधी)
सर्वपक्षीय, व्यापारी आक्रमक : भीती निर्माण करु नका; गुंडशाहीला जनता उत्तर देईल
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत संबंध आड येतात तेही जपावेच लागतात. त्यामुळे तंबी देऊन, भीती निर्माण करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न कुणी करू नये. सज्जनरावांना दिलेल्या धमकीचा आपण निषेध करतो. जनता याचा जरूर विचार करेल. परंतु वैभववाडीत दहशतवाद खपवून घेणार नाही, असे मत व्यापारी दिगंबर सावंत यांनी व्यक्त केले.बाहेरून माणसे आणून स्थानिकांमध्ये दहशत निर्माण करुन निवडणूक जिंकता येणार नाही. याचे भान ठेवावे. खेळीमेळीने निवडणुकीचा प्रचार सुरु असताना सज्जनरावांसारख्या जेष्ठांना धमकावले जात आहे. परंतु येथील नागरिक सुज्ञ आहेत. त्यामुळे विरोधकांच्या गुंडशाहीला जनताच उत्तर देईल, असे शिवसेनेचे जयेंद्र रावराणे म्हणाले.खेळीमेळीच्या वातावरणात नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू असताना गुंड आणून दहशत निर्माण करण्याची गरज नव्हती. परंतु ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची लढाई असल्याने त्यांना गुंड आणावे लागले. परंतु येथील नागरिकांना दहशतवाद नको आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालातून मतदार दहशतीचा निषेध नोंदवतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना तालुकाप्रमुख अशोक रावराणे यांनी व्यक्त केली. बाहेरून माणसे आणून निवडणूक लढविण्याची वेळ येत असेल तर ही पक्ष संपल्याची लक्षणे आहेत. त्यामुळे अशा पक्षाने नगरपंचायतीच्या निवडणुकीतून माघार घेतलेली बरी! अशा शब्दात मनसेचे माजी तालुकाध्यक्ष विजय रावराणे यांनी टीका केली.