कोणाचीही गुंडगिरी खपवून घेणार नाही
By admin | Published: March 6, 2016 12:54 AM2016-03-06T00:54:03+5:302016-03-06T00:54:03+5:30
जिल्हा प्रशासनाची भूमिका : आंदोलन सुरुच ठेवण्याचा संघटनेचा इशारा
सिंधुदुर्गनगरी : आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड करत हिंसक वळण देण्यात आले. पोलिसांनाही मारहाण झाल्याने लाठीचार्ज करावा लागला. अशी गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. तर आंदोलन सुरू ठेवण्यात येईल आणि वेळ पडल्यास मुंबईपर्यंत लॉँगमार्च काढला जाईल, असे डंपर चालक-मालक संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.
शनिवारी डंपर चालक-मालक संघटनेच्या आंदोलनाला सिंधुदुर्गनगरीत हिंसक वळण मिळाले. त्यामुळे पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. एकंदर परिस्थितीसंदर्भात जिल्हाधिकारी अनिल भंडारी आणि पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरीक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड उपस्थित होते.
जिल्हाधिकारी भंडारी म्हणाले की, वाळू उत्खनन करणाऱ्यांना ५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता बैठकीला बोलावले होते. मात्र, ४ मार्चलाच आंदोलन पुकारण्यात आले. तसेच शनिवारी आमदार वैभव नाईक यांच्यासह काही व्यावसायिकांबरोबर चर्चा सुरू असतानाच आंदोलकांकडून दगडफेक सुरू झाली. त्यामुळे लाठीचार्जचा आदेश द्यावा लागला.
वाळूसाठी लागणारे पास, एस.एम.एस. पद्धत ही संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग त्याला अपवाद ठरू शकत नाही. येथील डंपरची क्षमता केवळ २ ब्रास असताना ३ ब्रासची वाहतूक केली जाते. अनेक वेळा त्यामुळे अपघात होतात. त्यामुळे अनधिकृत व्यवसायावर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. याबाबत लोकशाही पद्धतीने चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, आज झालेला प्रकार निषेधार्ह आहे. या तोडफोडीत व मारहाणीत सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई केली जाईल.
पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले की, आंदोलकांकडून सार्वजनिक आस्थापनेची नासधूस, तोडफोड, पोलिसांना मारहाण करण्यात आली. आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच दगडफेक सुरू झाली. प्रमुख कार्यकर्त्यांना अटक झाली असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. यापुढेही अशी झुंडशाही खपवून घेतली जाणार नाही.
कर्मचारी संघटनेकडून निषेध
दरम्यान, राज्यसरकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात झालेल्या या घटनेचा निषेध म्हणून पुढील आठवडाभर सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फुटेजच्या आधारे गुन्हे दाखल होणार
शासकीय मालमत्तेची नासधूस करून पसार झालेल्या आंदोलकांना शोधून काढले जाईल. पोलिसांनी केलेल्या रेकॉर्डिंगच्या आधारे अशांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती दत्तात्रय शिंदे यांनी दिली.
‘भूजल’ची गाडी फोडली
अतिरीक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर यांच्या दालनाच्या काचा आंदोलकांनी फोडल्या. त्याचबरोबर इतर दालनांच्या काचाही फोडण्यात आल्या. आंदोलन एवढ्यावरच थांबले नाही. तर भूजल सर्वेक्षण विभागाच्या गाडीची तोडफोडही करण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी भंडारी यांनी दिली.
सनदशीर आंदोलन
जिल्हाधिकारी गेटसमोर भाजप, शिवसेना व इतर पक्षीय नेते लोकशाही पद्धतीने उपोषणाला बसले होते. त्यांच्यावरही पोलिसांनी लाठ्या उगारल्या. मात्र, त्यांनी आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहोत. त्यामुळे लाठीचा वापर करू नये असे सांगितले. (प्रतिनिधी)
डंपरसह मुंबईपर्यंत लाँगमार्च : एसपी, कलेक्टर नकोच
४शुक्रवारपासून शांततेत चाललेल्या आंदोलनाला हिंसक वळण लावणाऱ्यांवर प्रशासनाने जरूर कारवाई करावी. मात्र लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्यास ते योग्य नाही, असा निर्णय घेतानाच हे आंदोलन कायमस्वरूपी चालविले जाईल. आवश्यकता पडल्यास सर्व डंपरसह मुंबईपर्यंत लाँगमार्च केला जाईल असा निर्णय डंपर चालक-मालक संघटनेच्यावतीने घेण्यात आला.
४दरम्यान, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उपस्थित सर्व डंपरचालक-मालकांना एकत्रित केले व त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
४या जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांची पूर्णपणे मनमानी सुरु आहे. हे सहन करण्यासारखे नाही. त्यामुळे यांना कायमस्वरुपी जिल्ह्यातून घालविण्यासाठी संसदीय अधिकारांचा वापर करणार आहे.