तिजोरीत खडखडाट नाही खणखणाट आहे, राज्याची अर्थव्यवस्था रूळावर - सुधीर मुनगटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 10:05 PM2018-02-04T22:05:32+5:302018-02-04T22:05:34+5:30
आम्ही सत्तेत आलो होतो तेव्हा राज्याच्या तिजोरीत खडखडाट होता. पण आता राज्याची अर्थव्यवस्था रूळावर येत आहे. त्यामुळे तिजोरीतील खडखडाट संपवून खणखणाट सुरू झाला आहे.
सावंतवाडी : आम्ही सत्तेत आलो होतो तेव्हा राज्याच्या तिजोरीत खडखडाट होता. पण आता राज्याची अर्थव्यवस्था रूळावर येत आहे. त्यामुळे तिजोरीतील खडखडाट संपवून खणखणाट सुरू झाला आहे. यापुढे कोणत्याही कामात निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगटीवार यांनी दिले. ते सावंतवाडी येथे बोलत होते. यावेळी त्यांनी गोव्याने सिंधुदुर्गातील रूग्णांवर मोफत उपचार बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी लवकरच जिल्ह्यात एक नवीन आरोग्य यंत्रणा उभी केली जाईल, असे आश्वासनही दिले.
विविध कार्यक्रमांसाठी अर्थमंत्री मुनगटीवार हे सिंधुदुर्गात आले होते. त्यानिमित्ताने रविवारी येथील राजवाड्यात भाजपने मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली, अजित गोगटे, प्रदेश सरचिटणीस शरद चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, वेंगुर्लेचे नगराध्यक्ष राजन गिरप, राजेंद्र म्हापसेकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, काका कुडाळकर, राजू राऊळ, महिला जिल्हाध्यक्षा स्रेहा कुबल, श्वेता कोरगावकर, मंदार कल्याणकर, महेश सारंग आदी उपस्थित होते.
मंत्री मुनगटीवार म्हणाले, सिंधुदुर्गात चांदा ते बांदा या योजनेतून शंभर कोटीचा निधी आला आहे. मात्र हा निधी एवढ्यावरच थांबणार नाही, तर तुम्ही मागाल तेवढा निधी दिला जाईल. फक्त काम करा आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात समृध्दी आणण्याचे काम करा. ज्यांना पंधरा वर्षे सत्ता दिली होती, त्यांनी काही केले नाही म्हणून जनतेने त्यांना घालवले. पण आज ते पुन्हा सत्ता मागत आहेत. जनतेने आता त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे यापुढे भाजपच्या कार्यकर्त्याने जनतेत जाऊन आपण केलेली विकासकामे पोहोचवावित. आम्ही सत्तेवर आलो तेव्हा तिजोरीत खडखडाट होता. मागील सरकारने पंधरा वर्षे सरकारी तिजोरीवर दरोडे टाकण्याचेच काम केले होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता अर्थव्यवस्था रूळावर आणली आहे. सरकारी तिजोरीत खणखणाट आला आहे, त्यामुळे निधीची काळजी करू नका, असे आवाहनही मंत्री मुनगटीवार यांनी यावेळी केले.
सिंधुदुर्गाच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. पण मी लवकरच मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याशी चर्चा करून सिंधुदुर्गाच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तसेच केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या. त्याचा वापर करून घ्या. बचतगटांना सुवर्ण संधी निर्माण केली आहे. सर्व सामान्य जनतेला घरे मिळणार आहेत. या सर्वाच्या माध्यमातून भारतातील सर्वसामान्य जनतेचे जीवनमान आनंदी होणार असल्याचेही मंत्री मुनगटीवार यांनी सांगितले.
देशात वेगवेगळ्े १०६८ पक्ष आहेत. मात्र या सर्व पक्षांची प्रत्येकाकडे मालकी आहे. या सर्वांना अपवाद हा भाजपच आहे. या पक्षात सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळत आहे. त्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत भाजपची सत्ता आहे. ती सामान्य कार्यकर्त्याने सांडलेल्या रक्तामुळे. यापुढे लाल दिव्याची स्वप्न बघणाºयांनी पहिला लाल रक्ताच्या माणसाचे आयुर्मान सुधारण्यासाठी प्रयत्न करावा. मंत्रिपदे आज असतील उद्या नाही. तुमचे काम कायम राहणार आहे, असा टोला मंत्री मुनगटीवार यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता लगावला आहे.
माजी आमदार प्रमोद जठार यांनी ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा सिंधुदुर्गमधील जीवनमान बदलून टाकेल. त्यामुळे कोणीही याला विरोध केला तरी आम्ही या प्रकल्पाचे नेहमीच समर्थन करणार आहे. ग्रीन रिफायनरीच्या माध्यमातून सिंधुदुर्गमध्ये अद्ययावत रूग्णालय उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर माजी आमदार राजन तेली यांनी सावंतवाडी विधानसभा मतदार संघात यावेळी नक्कीच परिवर्तन होईल. शिवसेना येथील कार्यकर्त्यांवर अन्याय करीत आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी या मतदार संघाला विशेष पॅकेज द्यावे, असे आवाहन केले. या मेळाव्याच्या निमित्ताने सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्यातील भाजपच्या सरपंच व उपसरपंचांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मेळाव्याचे प्रास्ताविक महेश सारंग यांनी करत वन्यप्राण्यांच्या नुकसानीची मदत वाढवून देण्याची मागणी केली.
नारायण राणे यांना मंत्री करा : तळवणेकर
माजी सभापती मंगेश तळवणेकर यांनी यावेळी भाजपने देशात चांगले काम केले आहे. त्यामुळे सावंतवाडी मतदार संघातील आमदार हा भाजपचाच असणार आहे, असे सांगितले. तसेच तुमच्या मंत्रिमंडळात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना स्थान द्या. त्यामुळे जिल्ह्यातील प्रश्न सुटण्यास आणखी मदत होईल, असे सांगितले.
लाल दिव्यावर नको लाल रक्तावर प्रेम करा
माजी सभापती मंगेश तळवणेकर यांनी केलेल्या भाषणाचा धागा पकडून मंत्री मुनगटीवार यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना टोला लगावला. लाल दिव्यावर नको लाल रक्ताच्या माणसावर प्रेम करायला प्रत्येकाने शिकले पाहिजे, असे सांगत मी किती दिवस मंत्री आहे हे मलाच माहीत नाही. पण येथील सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. ते लोक कायम लक्षात ठेवतील, असेही मंत्री मुनगटीवार यांनी सांगितले.