एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही

By admin | Published: June 10, 2015 11:16 PM2015-06-10T23:16:44+5:302015-06-11T00:31:39+5:30

पुरेशा जागा : उत्तीर्ण विद्यार्थी सामावण्याइतक्या जागा महाविद्यालयांकडे उपलब्ध

No students will be denied admission | एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही

एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही

Next

रत्नागिरी : जिल्ह्यात ११९ अनुदानित कनिष्ठ महाविद्यालये आहेत. २४ स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालये आहेत. अनुदानित महाविद्यालयातील विद्यार्थी आसनक्षमता २५ हजार २८० इतकी आहे. जिल्ह्यातून २६ हजार ८३७ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते. त्यापैकी २५ हजार ८५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ९६.३४ टक्के इतका लागला आहे. त्यामुळे एकही विद्यार्थी अकरावी परीक्षेपासून वंचित राहणार नसल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अनुदानित महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त शाखा यांची विद्यार्थी प्रवेश क्षमता २५ हजार २८० आहे. यावर्षी २५ हजार ८५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रवेश क्षमतेपेक्षा केवळ ५७५ विद्यार्थी अधिक आहेत. अभियांत्रिकी तसेच तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शिवाय २४ स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी मर्यादा नाही. त्यामुळे यावर्षी एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नसून, महाविद्यालयापुढेच जागा भरण्यासाठी प्रश्न उभा राहणार आहे.
जिल्ह्यात ११९ कनिष्ठ महाविद्यालये असली तरी विशिष्ट महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. त्यामुळे काही महत्त्वाच्या महाविद्यालयातून प्रवेश मिळवण्यासाठी चढाओढ होत असलेली दिसून येत आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय महाविद्यालये व तेथील शाखानिहाय विद्यार्थी प्रवेश क्षमता पुढीलप्रमाणे :
मंडणगड तालुक्यात ६ कनिष्ठ महाविद्यालये असून, कला शाखेसाठी ३२०, विज्ञान शाखेसाठी १६०, वाणिज्यसाठी ३२०, तर संयुक्त शाखेसाठी १६० प्रवेश क्षमता आहे. एकूण प्रवेशक्षमता ९६० इतकी आहे. दापोली तालुक्यात ९ कनिष्ठ महाविद्यालये असून, एकूण प्रवेश क्षमता २१६० आहे. कला शाखा ८८०, विज्ञान ६४०, वाणिज्य ६४० जागा आहेत. संयुक्त शाखेसाठी महाविद्यालय नाही.
खेड तालुक्यात कला शाखेच्या १३६०, विज्ञान शाखा १२००, वाणिज्य शाखा १३६०, तर संयुक्त शाखेच्या ३२० जागा आहेत. तालुक्यात २२ कनिष्ठ महाविद्यालये असून, एकूण ४ हजार २४० प्रवेश क्षमता आहे. गुहागर तालुक्यात कला शाखेच्या ४००, विज्ञान शाखेच्या ४८०, वाणिज्य ३२०, तर संयुक्त शाखेच्या ४८० जागा आहेत. ६ महाविद्यालयातून एकूण १६८० जागा आहेत. चिपळूण तालुक्यात २७ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. तेथील विद्यार्थी प्रवेश क्षमता ५ हजार २८० इतकी आहे.
कला शाखेच्या १२८०, विज्ञान शाखेच्या १६००, वाणिज्यच्या १६००, तर संयुक्तच्या ८०० जागा आहेत.
संगमेश्वर तालुक्यामध्ये १४ कनिष्ठ महाविद्यालयात एकूण २ हजार ६४० प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी कला शाखेच्या ७२०, विज्ञान ६४०, वाणिज्य ८००, संयुक्त शाखेच्या ४८० जागा आहेत. रत्नागिरी तालुक्यातील १६ महाविद्यालयांमध्ये चार हजार ८० प्रवेश क्षमता आहे. कला शाखा ११२०, विज्ञान १२८०, वाणिज्य १२००, तर संयुक्त शाखेच्या ४८० जागा आहेत.
लांजा तालुक्यात एकूण ७ कनिष्ठ महाविद्यालयातून १७६० प्रवेश क्षमता आहे. कला शाखेच्या ४००, विज्ञान ४८०, वाणिज्य ६४०, संयुक्तच्या २४० जागा आहेत. राजापूर तालुक्यात १२ कनिष्ठ महाविद्यालये असून, २४८० प्रवेश क्षमता आहे. कला शाखेच्या ४००, विज्ञान ४००, वाणिज्य ४८०, तर संयुक्त शाखेच्या ८८० जागा आहेत.
एकूणच उपलब्ध असलेल्या जागा व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रश्न सुकर झाला यंदा प्रथमच असे चित्र आहे. (प्रतिनिधी)


एकही विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशापासून वंचित राहणार नसल्याचे शिक्षणाधिकारी अहिरे यांनी सांगितले. सुमारे सव्वीस हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार असल्याने प्रवेशाची स्थिती कशी असेल, असे विचारता सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असे ते म्हणाले.

Web Title: No students will be denied admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.