आंबोली धबधब्याला पर्यटकांची प्रतीक्षा; लॉकडाऊन, जिल्हाबंदीचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 02:43 AM2020-06-17T02:43:46+5:302020-06-17T02:44:27+5:30
वर्षा पर्यटनाचा पहिलाच रविवार सुनासुना
आंबोली : गेले चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोलीतील मुख्य धबधबा काही अंशी प्रवाहित झाला आहे. त्यामुळे आंबोलीत वर्षा पर्यटन हंगामाच्या पहिल्याच रविवारी गर्दी होईल अशी अपेक्षा होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या जिल्हा बंदीमुळे आंबोलीच्या वर्षा पर्यटनाकडे सर्वांनी पाठ फिरविली. याशिवाय शासनाने पर्यटन चालू करण्याबाबत कोणतेही धोरण स्वीकारले नसल्याने आंबोली धबधबा पर्यटकांच्या प्रतीक्षेत होता.
पर्यटक येत नसल्याने हातावरती पोट असलेल्या येथील पर्यटन व्यावसायिकांवर मात्र उपासमारीची वेळ येणार आहे. कारण गतवर्षीही अतिवृष्टीमुळे येथील वर्षा पर्यटन झाले नव्हते. त्यानंतर दिवाळी व नाताळ या कालावधीत येथील व्यावसायिकांनी काही प्रमाणात व्यवसाय केला. परंतु पुन्हा कोरोना विषाणूच्या फैलावामुळे आंबोलीतील मुख्य पर्यटन हंगाम मे महिनासुद्धा पर्यटनाविना सुनासुना गेला. त्यामुळे आतापर्यंत आंबोलीतील पर्यटन व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने योग्य नियोजन व नियमावली तयार करून येथील वर्षा पर्यटन चालू करावे, अशी मागणी येथील पर्यटन व्यावसायिकांमधून होत आहे.
तोंडचे पाणी पळाले
यावर्षी श्रावण महिनाही लवकर असल्यामुळे थोडाफार कालावधी वर्षा पर्यटनासाठी मिळणार होता. परंतु त्यात कोरोनामुळे जिल्हाबंदी असल्याने हाही वर्षा पर्यटन हंगाम होणार नाही अशी चिन्हे आहेत. त्यामुळे आंबोलीतील पर्यटन व्यावसायिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.