रिफायनरी प्रकल्प थांबविण्याची ताकद कुणात नाही, आमदार नितेश राणेंनी व्यक्त केलं स्पष्ट मत
By सुधीर राणे | Published: April 27, 2023 01:09 PM2023-04-27T13:09:12+5:302023-04-27T13:09:43+5:30
'प्रकल्प उभा राहिला की हेच ठेका घेणार'
कणकवली: बारसूमध्ये सध्या माती परीक्षणाचे काम सुरू आहे. तिथे रिफायनरीचे कामही सुरू झालेले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांसहीत आम्ही सरकारचे जेवढे प्रतिनिधी आहोत, या सर्वांची भूमिका स्पष्ट आहे. लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प होणार नाही. बारसू असेल वा नाणार तो भाग वगळून देवगड व राजापूरचा भाग असेल तिथे हा प्रकल्प होणार आहे. त्याठिकाणी ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार असून त्याला थांबविण्याची कुणात ताकद नाही, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.
रिफायनरी प्रकल्पाविषयी भूमीका स्पष्ट करण्यासाठी कणकवली येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्राचा हा मूळ प्रकल्प असल्याने त्याबाबत केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे पंतप्रधान व संबंधीत मंत्र्यांनाही भेटलेले आहेत. त्यावेळी माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार त्यांच्या सोबत होते. त्यामुळे सर्वांची सहमती घेऊनच, सर्वांना विश्वासात घेऊनच केंद्र व राज्य सरकार हा प्रकल्प राबविणार आहे. त्यामुळे कुणालाही आंदोलनाची गरज भासणार नाही. विरोधाची गरज भासणार नाही.
आता खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक हे विरोध करताना दिसत आहेत, ते स्वतःची किंमत वाढवत आहेत. खासदार राऊत आता उद्योगमंत्री उदय सामंतांवर टीका करतात. ते खासदार राऊत दिवसातून कितीवेळा उदय सामंत व किरण सामंत यांना फोन करतात व काय, काय बोलतात? याचा एकदा मी तपशिल जाहीर करणार आहे. मी खोटे बोलत असेन तर खासदार राऊत यांनी फोनचा 'सीडीआर रिपोर्ट' जाहीर करावा. एका बाजूला तुम्ही प्रकल्पाला विरोध करता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही उदय सामंत व त्यांच्या लोकांकडून स्वतःसाठी खर्च मागता. हे असे कसे होणार ?
विनायक राऊत व वैभव नाईक यांनी बारसू सारखीच भेट चिपी विमानतळ, सी-वर्ल्ड प्रकल्पाच्या विरोधावेळी दिली होती. आता विमानतळ सुरू झाले. त्यावेळी उद्घाटन करण्यासाठी कोण पुढे आले? जे विरोध करीत होते तेच आले. विमानतळ सुरू झाल्यानंतर लेबर व कॅटरिंग ठेका कोण मागत होते? ती विनायक राऊत यांचीच कंपनी होती. ब्लास्टिंग ठेका वैभव नाईक यांच्या कंपनीने घेतला. त्यामुळे त्यांचे दौरे हे लोकांसाठी नाहीत. प्रकल्प उभा राहिला की हेच ठेका घेणार आहेत. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. हेच विरोध करतात व काम झाले की हेच कामे घेतात, हे कसे काय? टोलबाबतही तीच स्थिती आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊनच हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प केंद्र व राज्य सरकार पूर्ण करणारच, असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.