मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे पुन्हा नळजोडणी

By admin | Published: April 12, 2017 12:20 AM2017-04-12T00:20:05+5:302017-04-12T00:20:05+5:30

शिवसेनेवर भाजपची मात; रत्नागिरीनजीकच्या तिवंडेवाडीतील संकुलाची नळ जोडणी पूर्ववत

Nodal reconciliation due to Chief Minister's intervention | मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे पुन्हा नळजोडणी

मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे पुन्हा नळजोडणी

Next



रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेने तोडलेली ४४२ सदनिकांच्या गृहसंकुलाची नळजोडणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे परत जोडण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी ही नळजोडणी पूर्ववत जोडण्याचे आदेश नगर परिषदेला दिल्यामुळे तत्काळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. भाजपकडे सत्ता असताना जोडलेल्या या जोडण्या शिवसेनेकडे सत्ता आल्यानंतर तोडण्यात आल्या. त्यामुळे आता यावरून राजकीय वाद उफाळण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्दीबाहेरील शिरगाव ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या तिवंडेवाडी येथे खासगी विकासकाने ४४२ सदनिकांचे संकुल उभारले आहे. त्यामधील २२५ सदनिकांमध्ये सध्या ११०० पेक्षा अधिक लोक राहत आहेत. रत्नागिरी नगर परिषदेत महेंद्र मयेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता असताना तिवंडेवाडीतील या संकुलास २ इंची नळ जोडणी थेट मुख्य जलवाहिनीवरून देण्यात आली होती. त्यावेळी जोडणी देण्यास प्रथम विरोध झाला होता. मात्र, नंतर सर्वांनीच तळ्यात-मळ्यात भूमिका घेतली व अखेर जोडणी देण्यात आली.
नोव्हेंबरमध्ये नगर परिषदेची निवडणूक होण्याआधी शिवसेनेकडून जनतेला हद्दीबाहेरील नळजोडण्या तोडण्याचे आश्वासन देण्यात आले होते. भाजपची सत्ता जाऊन नगर परिषदेत नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या नेतृत्वाखाली सेनेची एकहाती सत्ता आली. त्यानंतर तिवंडेवाडीतील गृहसंकुलाची नळजोडणी सेनेच्या रडारवर आली. ८ मार्च २०१७ च्या नगर परिषद बैठकीत ही जोडणी तोडण्याचा ठराव करण्यात आला. त्यानंतर २२ मार्चला ही जोडणी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांनी तोडली होती. अचानकपणे झालेल्या या कारवाईमुळे सदनिकांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला होता.
आता मंगळवारी दुपारी त्यांना नळजोडणी पूर्ववत करून देण्यात आली. मुख्य सचिवांचे आदेश आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ ही जोडणी करून दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Nodal reconciliation due to Chief Minister's intervention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.