अणाव नगरपंचायतीत नको
By admin | Published: February 24, 2016 12:12 AM2016-02-24T00:12:57+5:302016-02-24T00:12:57+5:30
ग्रामस्थांची मागणी : स्वतंत्र ग्रामपंचायतच ठेवा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीला रानबांबुळीपाठोपाठ अणाव ग्रामस्थांनी कडाडून विरोध करून जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याकडे लेखी हरकत मंगळवारी नोंदविली आहे. ही नगरपंचायत झाल्यास अणाव गावाला फायद्याऐवजी नुकसानच सहन करावे लागणार आहे. म्हणून अणाव गाव सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापनेतून वगळावे व स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात रहावी, अशी मागणीही यावेळी अणाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
ओरोस, रानबांबुळी व अणाव या तीन गावांची मिळून सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापन होण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाली. या नगरपंचायतीसंदर्भात कोणाच्या हरकती असल्यास एक महिन्याच्या आत नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले होते.
अणाव ग्रामस्थांनी हरकत नोंदविताना म्हटले आहे की, या गावात दोन हजार मतदार व दोन हजार सहाशे लोकसंख्या आहे. ग्रामीण भागात मोडणारा हा गाव आहे. हा गाव सिंधुदुर्गनगरीपासून लागून असला तरी सिंधुदुर्गनगरी ते अणाव असा जवळ जवळ सहा ते सात किलोमीटर अंतरावर या गावाचे टोक आहे. त्यात या ग्रामस्थांना शॉर्टकट असा अणावमधून एकही रस्ता सिंधुदुर्गनगरी येथे जाण्यासाठी नाही. सिंधुदुर्गनगरीत यायचे झाल्यास पणदूरमार्गे यावे लागते. म्हणून अणाव ग्रामपंचायत अस्तित्वात रहावी व गाव सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतमधून वगळावा, अशी मागणी अणावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष गोपाळ पालव, माजी सरपंच सेजल पाटकर, विनायक अणावकर, माजी उपसरपंच हरिश्चंद्र पवार, ग्रामस्थ योगेंद्र पालव, शशिकांत पालव, जनार्दन पालव, बाबूराव पालव, सुहास पालव, शोभना पालव, यांच्यासह १२९ ग्रामस्थांच्या सह्या या हरकतीवर आहेत. (प्रतिनिधी)