लक्षवेधी शोधमोहीम...लक्ष्य नसलेली... अंत नसलेली!
By admin | Published: August 7, 2016 12:35 AM2016-08-07T00:35:12+5:302016-08-07T01:01:32+5:30
महाड दुर्घटना : निश्चित आकडेवारीच नाही, मध्यरात्रीच्या दुर्घटनेमुळे ‘बेपत्तां’चे आकडे अधांतरी
विहार तेंडुलकर -- रत्नागिरी --महाड येथील दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध चौथ्या दिवशीही सुरुच आहे. अद्यापही अनेक लोक बेपत्ता आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने किती वाहने आणि किती लोक बेपत्ता झाले आहेत, याचा थांगपत्ता लागत नाही. प्रशासनाकडे असलेल्या बेपत्ता लोकांच्या यादीवरून ढोबळ मनाने ४८ लोक या दुर्घटनेत बेपत्ता झाल्याचे सांगितले जात आहे. २००९ साली झालेल्या फयान वादळानंतर राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेतही अशीच स्थिती उद्भवली होती. त्यामुळे महाडचे रेस्क्यू आॅपरेशन कोणतेही ‘लक्ष्य’ नसल्यामुळे कधी थांबवणार? याबाबत अजूनही द्विधाच स्थिती आहे.
महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याला आता चार दिवस उलटले आहेत. आत्तापर्यंत केवळ २५ मृतदेह सापडले आहेत. उर्वरितांचा शोध सुरु आहे. रेस्क्यू आॅपरेशनसाठी आलेल्या सर्व टीम या महाड परिसरातच शोध मोहीम राबवत आहे. दुसरीकडे मंडणगड, दापोली परिसरातील किनारपट्टीच्या गावांना शोध मोहिमेबाबत सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सध्याच्या घडीला या दुर्घटनेत एकूण ४८ लोक बेपत्ता झाल्याची प्रशासनाकडे माहिती आहे. त्यापैकी २५ जणांचे मृतदेह शनिवारी सायंकाळपर्यंत मिळाले आहेत. उर्वरितांचा शोध सुरु आहे. मात्र, या दुर्घटनेत आणखी एक कार गायब झाल्याची माहिती शुक्रवारी हाती आली. त्यामुळे आत्तापर्यंत नेमकी किती वाहने या दुर्घटनेची शिकार झाली, त्याचा केवळ अंदाज बांधणेच प्रशासनाच्या हाती आहे.
नेमकी रात्रीची घटना घडल्याने किती वाहने या पुराच्या पाण्यात वाहून गेली, याचा अंदाज बांधणेही कठीण झाले आहे. मंडणगडमध्ये मृतदेह सापडू लागल्यानंतर याठिकाणी शनिवारी एक टीम दाखल झाली तर एनसीआरएफच्या जवानांनी हेलिकॉप्टरमधून पाहणी केली. मात्र, केवळ स्थानिक लोकच मृतदेह गोळा करण्याचे काम करत आहेत. या साऱ्या गडबडीत आणखी किती काळ रेस्क्यू आॅपरेशन चालणार आणि किती जणांचा शोध घेतला जाणार? याबाबत शासनाकडून अजूनतरी उत्तर नाही.
त्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या दोन बस, तवेरा गाडी यांचा शोध लागल्यावर हे आॅपरेशन थांबविण्यात येणार असल्याची माहिती सध्यातरी मिळत आहे.
फयान अन् महाडची दुर्र्घटना
३६ वर्षानंतर नोव्हेंबर २००९मध्ये झालेल्या फयानसारख्या चक्रीवादळात अनेक मच्छीमार बेपत्ता झाले होते. या चक्रीवादळात २६ खलाशी मृत पावल्याचा आकडा होता. वादळाच्या कचाट्यात ३२ नौका सापडल्या होत्या. त्यापैकी केवळ तीन नौका किनारी परतल्या. उर्वरित नौकांची मोडतोड झाली, काही फुटल्या. २३० खलाशांना याचा फटका बसला. त्यातील ३९ खलाशी अनेक महिने झाले तरी बेपत्ताच होते. १६५ खलाशी सुखरुप होते तर २६ मृत झाले. प्रशासनाकडे येणाऱ्या तक्रारींवरुन हा आकडा कमीजास्त होत होता. महाड येथील दुर्घटनेतही कुणी बेपत्ता झाल्याची खबर आल्यानंतर प्रशासनाकडील आकडेवारी ‘अपडेट’ होत आहे.
अजूनही तर्कवितर्कच
ही घटना घडल्यानंतर तब्बल पाऊण तासांनी ती उघडकीस आली असावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या पाऊण तासात अनेक वाहने या दुर्घटनेत बेपत्ता झालेली असू शकतात. त्यामुळे प्रत्यक्षात कितीजण बेपत्ता झाले, याबाबत अजूनही तर्कवितर्कच लढविले जात आहेत.