निवतीतील अनधिकृत बांधकामांना प्रशासनाकडून नोटीसा
By admin | Published: February 2, 2016 09:10 PM2016-02-02T21:10:37+5:302016-02-02T21:10:37+5:30
मच्छिमारांमध्ये घबराटीचे वातावरण : शासनाने घरांच्या जमिनीची घरमालकाला विक्री करून अथवा भाडेतत्वावर देण्याची मागणी
म्हापण : निवती बंदर येथील शासकीय जागेतील मच्छिमार व्यावसायिकांनी बांधलेली घरे शासनाने अनधिकृत ठरवून ती हटविण्याच्या नोटिसा काही लोकांना पाठवल्याने या घरांमध्ये राहणाऱ्या मच्छिमारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. शासनाने या घरांसाठी वापरण्यात आलेल्या जमिनी घरमालकांना विक्री करून किंवा भाडे तत्त्वावर देण्याची मागणी मच्छिमारांमधून होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वेंगुर्ले तालुक्यातील मेढा ग्रामपंचायतीच्या कार्यकक्षेत येणारे निवती बंदर हे सिंधुदुर्ग जिल्हयातील एक प्रमुख व्यावसायिक बंदर आहे. येथून प्रतिवर्षी लाखो रूपयांची उलाढाल होते. गेल्या कित्येक वर्षांपासून हे मच्छिमार बांधव समुद्र किनाऱ्यावरील शासकीय जागेत आपली झोपडीवजा घरे बांधून राहतात. यातच ते आपले मच्छिमारी साहित्य ठेवतात. अशी १0८ घरे अस्तित्वात आहेत.
यातील काही मोजक्याच घरांना शासनाने संरक्षण दिल्याचे समजते. उर्वरित घरांवर जर कारवाईचा बडगा उचलला गेला तर या सर्व मच्छिमारांचे संसार उघड्यावर पडणार आहेत. शासनाने या घरांसाठी वापरलेल्या जागांची घरमालकांना विक्री करावी अथवा या जागा भाडेतत्वावर कराराने द्याव्यात अशी मागणी येथील मच्छिमारांकडून होत आहे. सध्या मात्र, प्रशासनाने बजावलेल्या नोटीसीमुळे मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)
जागा उपलब्ध करून देण्याचा बाँड : मेतर
४शासनाने या मच्छिमार बांधवांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून यातून मार्ग काढावा अशी मागणी केली आहे. आपण मच्छिमार बांधवांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे.
४शासनाला जेव्हा गरज भासेल तेव्हा स्वखर्चाने जागा उपलब्ध करून देऊ असा बाँड मच्छिमारांनी केला आहे.
४अशी माहिती ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य विजय मेथर यांनी दिली.