कणकवली शहरातील ‘दत्तकृपा’ कॉम्प्लेक्समधील सदनिकाधारकांना एसीबीकडून नोटिसा!
By सुधीर राणे | Published: February 21, 2023 08:08 PM2023-02-21T20:08:12+5:302023-02-21T20:08:19+5:30
संकुलातील रहिवाशांमध्ये खळबळ; वैभव नाईक यांनी बांधलेल्या इमारती आता लक्ष्य
कणकवली: ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची एसीबी चौकशी सुरू असतानाच कणकवली शहरात त्यांनी बांधलेल्या ‘दत्तकृपा’ कॉम्प्लेक्समधील काही सदनिकाधारकांना रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयाने चौकशीसाठी नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामुळे सदनिकाधारकांमध्ये खळबळ उडाली असून आमदार वैभव नाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
आमदार वैभव नाईक यांची एसीबी चौकशी सुरू असतानाच त्यांच्या आमदार निधीतून ज्या ग्रामपंचायतीला आमदार निधी दिला त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना तसेच काही विकास संस्था, मजूर संस्था यांना यापूर्वी एसीबीकडून चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील दत्तकृपा अपार्टमेंट मधील ५६ सदनिकाधारकाना एसीबीने चौकशीला हजर राहण्याबाबत नोटिसा बजावल्याने आता एकच खळबळ उडाली आहे.
या नोटीसमुळे आमदार वैभव नाईक यांच्या अडचणींमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. आमदार वैभव नाईक यांची एसीबी चौकशी सुरू असताना त्यांच्या घराची देखील मोजमापे घेण्यात आली होती. आता या अपार्टमेंट मधील सदनिकाधारकांना नोटिसा आल्यानंतर त्यांनी आम्ही पूर्णपणे या चौकशीला सहकार्य करणार असल्याची भूमिका घेतलीआहे.
आमदार नाईक यांनी बांधलेल्या सर्वच निवासी संकुलातील रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. ठाकरे गटात राहिलेल्या आमदार नाईक यांची रत्नागिरी एसीबीने चौकशी सुरू ठेवली आहे. काही दिवसांपूर्वी नाईक यांचा बंगला, दुकान, पाईप कारखाना तसेच इतर मालमत्तांची मोजमापे घेण्यात आली. त्यानंतर नाईक यांचा आमदार निधी ज्या ग्रामपंचायतींना वितरीत झाला, त्या ग्रामपंचायतींच्या कामांचीही चौकशी एसीबीकडून सुरू करण्यात आली. तसेच काही विकाससंस्थांनाही एसीबीने नोटिसा बजावल्या. त्यानंतर आता आमदार नाईक यांनी बांधलेल्या बांधकरवाडी येथील दत्तकृपा संकुलातील ५६ फ्लॅटधारकांना चौकशीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
या नोटिसीमध्ये संबधित सदनिकाधारकांनी त्या सदनिका कशा खरेदी केल्या ? याबाबतची माहिती तसेच पॅनकार्ड, आधारकार्ड साेबत आणण्याचे नमूद केले आहे. कणकवली शहरातील बांधकरवाडी, मधलीवाडी, परबवाडी या भागात नाईक यांनी निवासी संकुले उभारली आहेत. यातील दत्तकृपा या संकुलातील ५६ धारकांना नोटिसा आल्याने आता उर्वरीत संकुलातील रहिवाशांमध्येही खळबळ उडाली आहे.