पर्यटन व्यावसायिकांना नोटिसा, देवबाग, मालवणमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 03:33 PM2019-12-25T15:33:04+5:302019-12-25T15:34:58+5:30
देवबाग येथील बोटिंग आणि वॉटरस्पोर्ट्स एक खिडकीचा वाद पर्यटन व्यावसायिकांत धुमसत असतानाच बंदर विभागाचे प्रादेशिक बंदराचे निरीक्षक कॅप्टन सुरज नाईक यांच्या आदेशानुसार येथील बंदर विभागाने देवबाग आणि मालवणमधील १४ पर्यटन व्यावसायिकांना पर्यटन प्रवासी कराचा (लेव्ही) भरणा करावा, अशा नोटीसा बजावल्या आहेत.
मालवण : देवबाग येथील बोटिंग आणि वॉटरस्पोर्ट्स एक खिडकीचा वाद पर्यटन व्यावसायिकांत धुमसत असतानाच बंदर विभागाचे प्रादेशिक बंदराचे निरीक्षक कॅप्टन सुरज नाईक यांच्या आदेशानुसार येथील बंदर विभागाने देवबाग आणि मालवणमधील १४ पर्यटन व्यावसायिकांना पर्यटन प्रवासी कराचा (लेव्ही) भरणा करावा, अशा नोटीसा बजावल्या आहेत.
क्यार आणि महाचक्रीवादळाचा फटका बसल्याने आधीच पर्यटन व्यावसायिकांचे कंबरडे मोडले असतानाच आणि पर्यटन व्यवसायाला आता कुठे सुरुवात होत असतानाच प्रादेशिक बंदर निरीक्षकांनी प्रवासी कर भरणा करण्याचा फतवा काढल्याने जलक्रीडा व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
नाताळाची सुट्टी सुरु झाल्याने गेले चार पाच दिवस येथे देशी विदेशी पर्यटकांची रेलचल सुरु झाली आहे. येथे येणारे पर्यटक हे सिंधुदुर्ग किल्ला बरोबरच देवबाग, तारकर्ली, चिवला बीच, रॉक गार्डन या बरोबरच जलक्रीडांना पसंती देतात.
येथील पर्यटन हंगाम हा खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरु होतो. मात्र क्यार आणि महा या समुद्री चक्रीवादळाच्या फटक्यामुळे पर्यटन व्यवसाय कोलमडून गेला आहे. नाताळाची सुटी जाहीर झाल्याने गेले पाच सहा दिवस येथे पर्यटकांची रेलचेल वाढली आहे.
देवबाग येथे जलक्रीडा व्यवसायात एक खिडकी योजनेवरून वाद निर्माण झाला या वादावरून प्रादेशिक बंदर अधिकारी सुरज नाईक यांनी येथे भेट देत देवबाग येथील जलक्रीडा व्यावसायिकांची बैठक बोलावली होती.
या बैठकीत देवानंद चिंदरकर वगळता इतर पर्यटकांनी अनुपस्थिती दर्शविल्याने संतप्त झालेल्या कॅप्टन नाईक यांनी देवबागसह मालवणमधील १४ जलक्रीडा व्यावसायिकांना शासनाचा प्रवासी कर भरावा. अन्यथा कारवाई करू असा इशारा दिला.
पर्यटन व्यवसाय थंडावल्यामुळे कर भरण्यास उशिर
वस्तूत: देवबाग किंवा मालवणमधील जलक्रीडा व्यावसायिक हे दरवर्षी वेळेतच प्रवासी कर (लेव्ही) भरतात. यावेळी मात्र क्यार, महा या वादळामुळे पर्यटकांची संख्या रोडावली. त्यामुळे पर्यटन व्यवसाय थंडावला. परिणामी या जलक्रीडा व्यावसायिकांना कर भरण्यास उशीर झाला आहे.
अशावेळी कॅप्टन सुरज नाईक यांनी येथील बंदर अधिकाऱ्यांना जलक्रीडा व्यावसायिकांना प्रवासी कराचा भरणा करण्यात यावा अशा आशयाच्या नोटीसा बजावण्यास सांगितल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी येथील बंदर अधिकाºयांनी या नोटीसा बजावल्या.