वाळू रॅम्पवर आता ‘सीसीटीव्ही’चा डोळा
By admin | Published: April 27, 2016 10:11 PM2016-04-27T22:11:06+5:302016-04-27T23:21:07+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : वाळू उपशावर नियंत्रण ठेवणार, मालवणसह कुडाळात १८ ठिकाणी सीसीटीव्ही
मालवण : राज्यात होत असलेल्या अवैध वाळू व्यवसायावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. राज्यपातळीवर झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या वैठकीत वाळू उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाळू उत्खनन परिसरात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावण्याचे सुचित करण्यात आले आहे.
त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून संबंधित तालुक्यातील तहसिलादाराना लेखी पत्र पाठवून मालवण व कुडाळ तालुक्यातील १८ वाळू व्यावसायिकांना तत्काळ ‘सीसीटीव्ही’ बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अवैध वाळू व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कर्मचाऱ्यांची मदत होणार असून मालवणसह कुडाळमधील १८ वाळू रॅम्पवर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित होणार आहेत.
दरम्यान, मालवण तालुक्यातील १२ वाळू व्यावसायिकांना तालुका ‘महसूल’कडून सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. याबाबत तहसीलदार वनिता पाटील यांना विचारले असता, महसूलकडून संबंधित वाळू व्यावसायिकांना पत्रव्यवहार करून मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या मार्फत सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र व्यावसायिकांकडून आजपर्यंत कार्यवाही झाली नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. किमान तीन आठवड्याचे रेकॉडींग उपलब्ध करता येणार असल्याने एखाद्या घटनेचा मागोवा घेण्यासाठी उपयोग होणार आहे. हे कॅमेरे व्यावसायिकांनी स्वखर्चाने कार्यान्वित करायचे
आहेत. (प्रतिनिधी)
सीसीटीव्हीची कार्यवाही व्हावी
जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्राप्त झालेल्या पत्रात वाळू उत्खनन परिसरात रॅम्पवर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले नसतील तर वाळू व्यावसायिक वाळूगटातील वाळू उपसा पूर्णत: बंद ठेवण्यात यावे, असे आदेश जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहेत. कुडाळ तालुक्यातील ६ तर मालवण तालुक्यातील १२ व्यावसायिकांना सदरील आदेश देण्यात आले आहेत. यात मालवणमधील गुरुनाथ पाटकर (देवली), श्यामसुंदर वाक्कर (देवली), राजन सारंग (आंबेरी), सचिन आंबेरकर (चौके), प्रदीप सामंत (आनंदव्हाळ), साईनाथ देसाई (धामापूर), महापुरुष श्रमिक वाळू उत्पादक सहकारी संस्था (काळसे), संतोष पाटील (तोंडवळी), यतीन खोत (हडी), अनिल भगत (हडी), प्रवीण खोत (मसुरे-खोतजुवा), महादेव चव्हाण (देवली) तर कुडाळमधील प्रमोद नाईक (कवठी), सुधीर म्हाडदळकर (कविलगाव-नेरूर), देवेंद्र नाईक (चेंदवण), सागर परब (सरंबळ), सुशीलकुमार कदम (सरंबळ), लक्ष्मीनारायण मजूर सहकारी संथ (वालावल).