आता उत्सुकता नगराध्यक्ष आरक्षणाची

By admin | Published: November 5, 2015 11:07 PM2015-11-05T23:07:19+5:302015-11-06T00:01:34+5:30

आरक्षण ठरवणार नगरपंचायतीचा कारभार : युतीला हवे ‘खुले’ तर आघाडीला ‘मागासवर्गीय

Now the euphoria is the city president's reservation | आता उत्सुकता नगराध्यक्ष आरक्षणाची

आता उत्सुकता नगराध्यक्ष आरक्षणाची

Next

 वैभव साळकर-- दोडामार्ग --कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत सेना-भाजपा युतीने निर्विवाद वर्चस्व मिळविले असले, तरी अद्याप नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने नगराध्यक्ष कोणाचा होणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे. परिणामत: नगराध्यक्षाच्या आरक्षणानंतरच नगराध्यक्षपदाच्या मोर्चेबांधणीस सुरूवात होणार आहे. आरक्षण खुले पडल्यास सेनेकडून संतोष म्हावळंकर, तर भाजपाकडून चेतन चव्हाण यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र, जर आरक्षण मागासवर्गीय समाजासाठी पडले, तर नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाईल. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत.कसई दोडामार्ग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत १७ पैकी सेना-भाजपा युतीच्या १० जागा जिंकून आल्या. तर एका ठिकाणी मनसे, चार जागांवर काँग्रेस आणि दोन जागांवर राष्ट्रवादीला संधी मिळाली. एकंदरीत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत सेना-भाजपने बाजी मारली. सेना-भाजपाला प्रत्येकी पाच-पाच जागा मिळाल्या. परंतु तरीसुध्दा मागासवर्गीय समाजाचा उमेदवार युतीचा निवडून आला नाही. याठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार अरूण जाधव निवडून आले. परिणामत: सत्ता जरी आली असली, तरी युतीकडे मागासवर्गीय समाजाचा नगरसेवक उपलब्ध नाही. त्यामुळे जर नगराध्यक्षपद मागासवर्गीय समाजासाठी आरक्षित झाले, तर आपसूकच राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद मिळेल.
जर खुल्या प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद आरक्षित झाले, तर सेनेकडून संतोष म्हावळंकर आणि भाजपाकडून चेतन चव्हाण यांचा दावा होऊ शकतो. जर हे पद खुल्या अथवा इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्यास सेनेकडून इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभाग क्र. ७ मधून निवडून आलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्या संध्या राजेश प्रसादी यांना, तर भाजपाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या रेश्मा उद्देश कोरगावकर यांना संधी मिळू शकते.
परंतु इतर मागास प्रवर्ग (पुरूष) साठी जर नगराध्यक्षपद राखीव आले, तर भाजपाचे सुधीर पनवेलकर हे एकमेव दावेदार युतीकडून असतील. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. कारण त्यानंतरच राजकीय घडामोडींना सुरूवात होईल. नगराध्यक्षपदाची पहिली संधी कोणाला द्यावी, या सेना-भाजपाच्या निर्णयावर देखील बरीच राजकीय समीकरणे अवलंबून असतील.


काँग्रेसचा सावध पवित्रा!
दरम्यान, सध्या तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून पराभवानंतर नगरपंचायतीत विरोधात बसण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. एक सक्षम विरोधक म्हणून भूमिका पार पाडू, अशी प्रतिक्रिया काँगे्रसचे प्रचारप्रमुख संजू परब यांनी दिली. मात्र, प्रत्यक्षात आघाडीची नेतेमंडळी सर्व राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असून, नगराध्यक्षपदाच्या आरक्षणानंतर घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर आघाडीची निर्णय प्रक्रिया अवलंबून असेल. परंतु तूर्तास तरी काँग्रेस-राष्ट्रवादी सावध भूमिकेत असल्याचे चित्र आहे.


नगराध्यक्षपदाची निवड हा निवडणूक आयोगामार्फत आदेश काढून करण्यात येते. अजूनतरी दोडामार्ग नगरपंचायत नूतन नगराध्यक्षपदासाठी कागदोपत्री काहीच आदेश आले नाहीत. निवडणूक आयोगामार्फत आदेश आल्यानंतर याची तत्काळ कार्यवाही करण्यात येईल. तोपर्यंत आहे त्याच प्रमाणे प्रशासकामार्फत कारभार सुरू राहील.
- विठ्ठल इनामदार,
उपविभागीय महसूल अधिकारी

Web Title: Now the euphoria is the city president's reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.