शाळांवर आता ‘सीसीटीव्ही’ची नजर
By admin | Published: April 26, 2016 09:18 PM2016-04-26T21:18:10+5:302016-04-27T00:58:11+5:30
शासनाचा सक्तीचा आदेश : सिंधुदुर्गातील २१५ शाळांचा समावेश; विद्यार्थिनींची सुरक्षा बळकट होणार
गिरीश परब -- सिंधुदुर्गनगरी --शालेय विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराबाबत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या खासगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवर ‘वॉच’ ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सिंधुदुर्गातील खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिले आहेत. शासनाच्या या धोरणात्मक निर्णयामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता बळकट होणार आहे. शासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे काम सिंधुदुर्गाच्या माध्यमिक शिक्षक विभागाने सुरू केले आहे. या जिल्ह्यात असणाऱ्या २१५ खासगी शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवा या आशयाचे पत्र व सूचना दिल्या गेल्या आहेत. सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून सीसीटीव्हीची अंमलबजावणी सर्व खासगी शाळांमध्ये करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. शाळा तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये असणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना कोणत्याही अनुचित प्रकाराला सामोरे जावे लागू नये आणि वेळीच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला बळकटी देता यावी यासाठीचा शासनाचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्याचे सांगितल जाते.
सीसीटीव्हीचा सहा महिन्यांपासून आढावा घेणे बंधनकारक
जिल्ह्यातील सर्व खासगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची कार्यवाही पूर्ण झाल्याबाबत खात्री करून सर्व माहिती गोळा करून ती विभागीय शिक्षण उपसंचालकांना सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक सहा महिन्यांनी सीसीटीव्हीचा आढावा घेणे शासनाने बंधनकारक केले आहे. खासगी शाळांमध्ये आपला मुलगा जमेल ती फी देऊन शिकविण्यास पाठविणाऱ्या पालकांनी शासनाच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. कारण शाळांमधील घडणाऱ्या घटनांची माहिती आता सीसीटीव्हीत कैद होणार आहे.