आता बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सवरच
By admin | Published: August 16, 2016 09:56 PM2016-08-16T21:56:01+5:302016-08-16T23:42:13+5:30
कोकण कृषी विद्यापीठ : दुर्घटना, वेळ वाचवण्यासाठी कुलगुरूंचा निर्णय
शिवाजी गोरे -- दापोली --महाडसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग या चारही जिल्ह्यांतील रिसर्च सेंटरशी यापुढे थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्याचा ऐतिहासिक निर्णय कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य यांनी घेतला आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती व अतिवृष्टी याचा विद्यापीठातील बैठकांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुळदे व ठाणे जिल्ह्यातील वाडा, रायगड जिल्ह्यातील कर्जत ही वेगवेगळी टोके आहेत. या ठिकाणाच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास बैठकांसाठी येणाऱ्यांचा वेळ, पैसा याचा अपव्यय होतो. त्याहीपेक्षा अतिवृष्टीच्या काळात महाडसारखी दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीसाठी दापोलीला येण्यासाठी दोन दिवस मोडण्यापेक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद सुलभ होणार आहे.
दापोली कोकण कृषी विद्यापीठातील बैठकीसाठी लागणारा वेळ, पैसा त्याहीपेक्षा महाडसारखी दुर्घटना टाळण्यासाठी कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य यांनी हे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. यापुढे दापोली कोकण कृषी विद्यापीठात बैठकीनिमित्त विभागप्रमुख, शास्त्रज्ञ यांना येण्याची गरज नाही. त्यांना विद्यापीठात आठ दिवसांनी, पंधरा दिवसांनी तसेच महिन्याला बैठकीसाठी विद्यापीठात यावे लागत होते. परंतु, आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट कुलगुरु, संचालक, कुलसचिव यांच्याशी संवाद साधता येणार आहे.
कृषी विद्यापीठातील महत्वाची माहिती, आपत्कालीन बैठक, शेतकरी वर्गाला द्यावयाची माहिती, शासनाचे धोरणाबद्दलची माहिती ही शास्त्रज्ञ, विभागप्रमुख, कुलगुरु व संचालक हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेणार असून, तत्काळ उपाययोजना निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आधुनिक युगात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रगतीकडे वाटचाल होण्याच्या दृष्टीने डिजिटल इंडियाचा रोल फार महत्वाचा ठरणार आहे. कोकण कृषी विद्यापीठांतर्गत चारही जिल्ह्यातील रिसर्च सेंटर, कॉलेज यांच्याशी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यासाठी खर्च अधिक होईल, असे काही लोकांचे म्हणणे होते. मात्र, व्हिडिओ कॉन्फरन्समुळे वेळ, प्रवासाचा होणारा त्रास आणि कर्मचाऱ्यांचा होणारा खर्चसुद्धा वाचणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत त्यांना दुर्घटनेला सामोरे जावे लागणार नाही.
कृषी विद्यापीठात बेठकीसाठी येताना कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. दुर्दैवाने कोणालाही महाडसारख्या दुर्घटनेला सामोरे जाऊन जीव गमवावा लागू नये. या दृष्टीने कृ षी विद्यापीठातील सर्वच संशोधन केंद्र, कॉलेज यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद सुरु केला आहे.
- डॉ. तपस भट्टाचार्य, कुलगुरु, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली